Saturday, November 23, 2024
HomeMarathi News Todayसरकारला ‘भारत जोडो यात्रा’ रोखावी वाटत असेल तर जरुर रोखावी !…राहुल गांधी

सरकारला ‘भारत जोडो यात्रा’ रोखावी वाटत असेल तर जरुर रोखावी !…राहुल गांधी

अकोला, दि. १७ नोव्हेंबर
भारत जोडो यात्रा हा एक विचार आहे, प्रवास आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण, दुकानदार सर्वांच्या समस्या, वेदना, व्यथा लोक या पदयात्रेत मांडत आहेत. ही पदयात्रा देश जोडण्याच्या उदात्त हेतूने निघाली आहे. पदयात्रेतून प्रेमाचा संदेश दिला जात आहे, द्वेष पसरवला जात नाही, असे असतानाही जर सरकारला ही पदयात्रा रोखावी असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल रोखावी, असे खा. राहुलजी गांधी यांनी परखडपणे सांगितले.

भारत जोडो यात्रेदरम्यानची राहुलजी गांधी यांची ही सहावी पत्रकार परिषद चानी फाटा वाडेगाव, जिल्हा अकोला येथे पार पडली. यावेळी ते पुढे म्हणाले की, देशात एक द्वेष पसरवणाऱ्यांची विचारधारा आहे तर दुसरी विचारधारा देश जोडणाऱ्यांची आहे. द्वेष पसरवून देश भक्कम कसा होतो ? त्यामुळे तर देश कमजोर होतो. विविधतेत एकता ही या देशाची ओळख आहे, ही ओळख कायम ठेवण्यासाठी, देश जोडण्यासाठी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ही पदयात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात या पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला व यातून मला खूप काही शिकायला मिळाले. महात्मा गांधी यांनी देशातून वर्धा येथेच राहण्याचा विचार का केला असावा? याचे उत्तर मला या विदर्भाच्या भूमित आल्यानंतर कळले. खरी काँग्रेस विदर्भात, महाराष्ट्रात आहे. काँग्रेसच्या विचारांची ही भूमी आहे.

सावरकर यांच्याबाबत मी जे वक्तव्य केले होते त्यात चुकीचे काहीच बोललो नाही, जे ऐतिहासिक सत्य आहे तेच मी मांडले, हे सांगताना राहुलजी गांधी यांनी सावरकर यांनी ब्रिटीश सरकारला लिहिलेले पत्र दाखवून त्यातील काही मजकूरही वाचून दाखवला. महात्मा गांधी, पंडित नेहरू, सरदार पटेल यांनाही इंग्रजांनी अनेक वर्ष तुरुंगात डांबले होते पण त्यांनी ब्रिटीश सरकारला पत्र लिहून आपली सुटका करुन घेतली नाही. हा या दोन विचारधारेतील फरक आहे. एक गांधींची विचारधारा तर दुसरी सावरकरांची.

देश तुटलेला नाही तर मग भारत जोडो पदयात्रेची गरज काय असा प्रश्न भाजपा करत आहे.पण मागील ८ वर्षात देशातील वातावरण पूर्णपणे बदलेले आहे.जनतेचा आवाज ऐकला जात नाही, शेतकरी, तरुण, कष्टकरी यांचा आवाज सरकार ऐकत नाही. संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नाही. देशात अनेक समस्या आहेत पण त्या सरकार ऐकून घेत नाही, द्वेष, हिंसा पसरवून भीतीच्या सावटाखाली जनतेला ठेवले जात आहे. स्वायत्त संस्थांवर सरकारचा दबाव आहे. न्यायपालिकाही यातून सुटलेल्या नाहीत अशा परिस्थितीत जनतेचा आवाज ऐकण्यासाठी ही भारत जोडो यात्रा आहे. दररोज हजारो लोक त्यांच्या व्यथा, वेदना, समस्या मांडत आहेत, त्यासाठीच ही पदयात्रा आहे.

शेतकरी आत्महत्यांसंदर्भात उत्तर देताना राहुलजी गांधी म्हणाले की, शेतकरी आत्महत्या ही फक्त विदर्भातील समस्या नाही तर देशभरातील शेतकऱ्यांची समस्या आहे. शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर देशाला अन्नधान्य पुरवणाऱ्या या बळीराजाला आधार देण्याची, मदत करण्याची, त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे रक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. युपीए सरकार असताना शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली होती पण आता केंद्रातील भाजपा सरकार शेतकऱ्यांचा आवाज ऐकत नाही, त्यांना मदत देणे तर दुरची बाब आहे. तरुणांच्या बाबतीतही तीच परिस्थिती आहे. तरुण मुले मुली शिक्षण घेत आहेत. शिक्षणावर खर्चही जास्त होत आहे पण इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आपण इंजिनिअर होऊच याची खात्री नाही. नोकऱ्या नाहीत त्यामुळे तरपणांचे भविष्य, त्यांची स्वप्ने अंधकारमय झाली आहेत. या समस्यांकडे सरकार लक्ष देत नाही हे जनतेच्या लक्षात आले आहे असेही राहुलजी म्हणाले.
राहुलजी गांधी यांनी ४० मिनिटे पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. व महाराष्ट्रातील पत्रकारांसमवेत छायाचित्रही काढले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, प्रवक्ते डॅा. राजू वाघमारे, कपिल ढोके, डॅा. सुधीर ढोणे आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: