नांदेड – महेंद्र गायकवाड
विद्यार्थ्यांना ज्ञानी आणि प्रगल्भ बनवायचे असेल तर शालेय अभ्यासक्रमातील वाचनाव्यतिरिक्त इतर ज्ञानवर्धक पुस्तके वाचण्याची गोडी पालक व शिक्षकांनी मुलांना लावावी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वतः वाचनाची आवड निर्माण केल्यास दिल्यास नवी पिढी सक्षम भविष्य घडवेल, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
ग्रंथालय आपल्या दारी आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष व मराठी भाषा पंधरवाडा साजरा करण्यासाठी शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांना ग्रंथालयाचे सभासद होण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. आज बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी सिडको येथील कुसुम माध्यमिक विद्यालयात या उपक्रमाचा आरंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
याप्रसंगी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सूर्यवंशी, एसजीजीएसचे अधिष्ठाता डॉ. रवींद्र जोशी, वनिता जोशी, मिलिंद व्यवहारे, गोविंद सुरनर आदींची यावेळी उपस्थिती होती. पुढे त्या म्हणाल्या, मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे.
विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे सभासद केल्यानंतर विज्ञान, कला, संस्कृती या विषयावरील गोष्टीरूप, थोर नेते व राष्ट्रपुरुष यांचे चरित्रे, प्रवास वर्णन आणि इतिहास अशा विविध विषयाची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावीत. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना अवांतर पुस्तक वाचण्याची गोडी लागावी यासाठी राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे व लातूरचे शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे सदस्य करून त्यांना पुस्तक उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार ही मोहीम जिल्हा परिषदेने गतिमान केली आहे. नांदेड जिल्ह्यात सुमारे 758 ग्रंथालय असून माध्यमिक विभागाच्या 834 शाळा आहेत. 12 हजार 347 खाजगी शिक्षक तर माध्यमिकचे 2 लाख 45 हजार 758 विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचे मोफत सदस्य करून त्यांना दर आठवड्यातून एकदा पुस्तक वाचण्यासाठी दिले जाणार आहे. आज कुसुम माध्यमिक विद्यालयाचे 1 हजार 340 विद्यार्थी व 49 शिक्षक हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालयाचे सभासद झाले आहेत.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा पुस्तके दिली तर येणारी पिढी समृद्ध बनेल, असे मत शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी प्रास्ताविकेत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. रवींद्र जोशी यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सहशिक्षक विश्वास हंबर्डे तर आभार वंदना सोनाळे यांनी मानले.