सांगली – ज्योती मोरे
महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणाचा कर्नाटक सरकार गैरफायदा घेत आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच्या आज जत तालुक्यातील जनतेच्या हितासाठी विस्तारित म्हैसाळ योजनेला दोन हजार कोटी रुपये मंजूर करून आपण बाळासाहेब ठाकरे यांचे अनुयायी असल्याचे कृतीतून दाखवून द्यावं, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर यांनी व्यक्त केली आहे. जत दौऱ्यावरून आल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने जत तालुक्यातील पूर्व भागाच्या गावांचा प्रश्न हाताळायला पाहिजे होता तो न हाताळता बेफिकिरी दाखवली. परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही योजना का मंजूर केली नाही. या बोटचेपी भूमिकेचा कर्नाटकचे मुख्यमंत्री गैरफायदा घेत आहेत.
अवघ्या दोन हजार कोटींसाठी महाराष्ट्राची अब्रू घालवण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करू नये. असा टोलाही काटकर यांनी यावेळी लगावला. दरम्यान सरकारने गांभीर्याने घेतलं नाही तर शिवसेनेच्या वतीने जत तालुक्यापासून सांगली जिल्ह्यात आंदोलन करणार असल्याचा इशाराही काटकर यांनी दिला आहे.