राजस्थानच्या हनुमानगडमध्ये भारतीय हवाई दलाचे MiG-21 विमान कोसळल्याची बातमी आहे. विमान अपघातात पायलट सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिग-21 विमानाचा मलबा घराच्या छतावर पडल्याने 3 महिलांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, फायटर जेट पायलटने पॅराशूटचा वापर करून वेळीच विमानातून उडी मारली.
अपघातात जखमी झालेल्या पायलटसाठी हवाई दलाचे Mi 17 हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. या विमान अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. हे विमान बहलोल नगर गावाच्या हद्दीत पडले. बिकानेर रेंजचे पोलीस महानिरीक्षक ओम प्रकाश यांनी सांगितले की, हनुमानगड जिल्ह्यातील पिलीबंगाजवळ झालेल्या विमान अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला असून तीन महिला जखमी झाल्या आहेत. बन्सो कौर, बंटो आणि लीलादेवी अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तीन महिलांची नावे आहेत.
अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या संख्येने लोक जमा झाले असून पोलीस व प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिकाऱ्याने सांगितले की, हवाई दलाला माहिती देण्यात आली असून तेच अपघाताच्या कारणाबाबत तांत्रिक माहिती देऊ शकतील. अधिकाऱ्याने सांगितले की, पायलटने विमानाला गावापासून दूर नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आणि विमान गावाच्या एका टोकाकडे नेले. अशा घटनांतील मृतांसाठी मदत आणि भरपाईची तरतूद असून त्यानुसार सर्व पावले उचलली जातील, असे ते म्हणाले.