Sunday, December 22, 2024
Homeराज्यमाहित नाही मतदारसंघात किती आहेत गाव…!अन इच्छुक म्हणतो मला आमदार करा की...

माहित नाही मतदारसंघात किती आहेत गाव…!अन इच्छुक म्हणतो मला आमदार करा की राव…!

नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदासंघात सोशलमीडियाद्वारे इच्छुकांचा प्रचार…

नांदेड – महेंद्र गायकवाड

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात हि अनेक इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. ऐरवी मतदारसंघात कधीही न दिसणारे व जनतेला अपरिचित असणारे इच्छुक उमेदवार आपआपल्या मतदारसंघात पक्षाने संधी दिल्यास मी निवडणूक लढविणार असे म्हणत आहेत. तर कांही इच्छुक उमेदवार पूर्वी पासूनच मतदारसंघात भेटीगाठी करीत असल्याने त्यांचा जनतेशी थेट संबंध आहे.

मात्र कांही नवखे, शेवट पर्यंत न टिकणारे,पक्षात आपले वजन वाढावे म्हणून फुकटची प्रसिद्धी मिळू पाहणारे व प्रसिद्धीची हाव असणारे अनेक इच्छुक उमेदवार हि निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करीत असल्याने माहित नाही मतदारसंघात किती आहेत गाव…अन इच्छुक म्हणतो मला आमदार करा की राव…अशी चर्चा जनतेतून ऐकावंयास मिळत आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ येताच जिल्ह्यातील अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापासूनच प्रचारास लागले आहेत.फिक्स आमदार, भावी आमदार, जनतेला हवा.. चेहरा नवा अशा प्रकारची बॅनरबाजी सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जणू इच्छुक उमेदवारांची स्पर्धाच लागली आहे की काय असे वाटत आहे.

अनेक मतदारसंघात सेवानिवृत्त अधिकारी, दिव्यांग बांधव, तृतीयपंथी, आजी माजी आमदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे पदाधिकारी, नवखे तरुण हि आहेत तर कोणी सुनेसाठी, मुलीसाठी तर कोणी मुलासाठी उमेदवारवारी मागत असल्याने घराणेशाहीला हि ऊत आला आहे. मतदारसंघात कधीही न दिसणारे, जनसामान्याच्या समस्या कधीही न सोडविणारे, अडीअडचणीत सामाजिक, आर्थिक मदत न करणारे व फक्त निवडणूक आली की मतदारसंघात दिसणाऱ्या इच्छुकांची संख्या हि मोठया प्रमाणात दिसून येत आहे.

पक्षाला अच्छे दिन आल्याने इच्छुक उमेदवारातील खरा निष्ठावंत हि जागा झाला आहे. त्यामुळे मी पक्षाशी एकनिष्ठ असल्याने मलाच उमेदवारी मिळणार अशी वल्गना करीत अनेकजण फिरत आहेत. महायुतीत असणारे भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट यांच्या सह महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उबाठा गट यांच्यासह विविध घटक पक्षाच्या इच्छुक उमेदवारात आतापासूनच उमेदवारी साठी रस्सीखेच लागली आहे. अनेक इच्छुकांना आपआपल्या मतदारसंघात किती गावे आहेत, मतदारसंख्या किती आहे, जिल्हापरिषद सर्कल, पंचायत समिती गण, किती नगरपालिका आहेत. या सह विधानसभानिहाय किती बूथ आहेत.

याची इतमभूत माहिती नाही. त्याच बरोबर मतदारसंघातील काय समस्या, अडीअडचणी आहेत याचीही माहिती नाही, तर अनेकांना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीचाही अनुभव नाही.अनुभव नसला तरी जनतेशी नाळ जुडलेली नाही ,जनतेत काम नाही,जनसंपर्क नाही. केवळ निवडणूक आली की जनतेची आठवण करणारे,अशातच कोणत्या आधारे निवडणूक लढविणार, कोणत्या पक्षांकडून निवडणूक लढविणार हे सुद्धा माहित नाही.

इच्छुकांची भरमसाठ संख्या पाहता विद्यमान आमदरापुढे हि मोठे आव्हान निर्माण झाले आहे.परंतु शेवटपर्यंत कोण टिकणार, निवडणूक लढविणार की नाही हे सुद्धा सांगता येत नसले तरी सोशल मीडिया, युट्युब, फेसबुक, इंस्टाग्राम, व विविध वृतमानपत्रातून इच्छुक उमेदवारांनी आपली प्रसिद्धी करून घेतली आहे. इच्छुक उमेदवारांच्या नावाने व्हाट्सअपवर अनेक ग्रुप काढण्यात आले आहेत.त्यामुळे “माहित नाही मतदारसंघात किती आहेत गाव… “अन इच्छुक म्हणतो मला आमदार करा की राव ” अशी चर्चा जनतेतून ऐकावंयास मिळत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: