Monday, November 25, 2024
Homeराज्यरामटेक मधील शेकडो घरे ‘गणितीय आकाशदिव्यांनी’ उजळणार...

रामटेक मधील शेकडो घरे ‘गणितीय आकाशदिव्यांनी’ उजळणार…

रामटेक – राजु कापसे

रामटेक येवू घातलेले दिपपर्व, मुलांची आटोपत आलेली परीक्षेची लगबग आणि गणित शिक्षकांचा वेगळं काही करण्याचा ध्यास यातून प्रत्यक्षात उतरले गणितीय आकाशादिवे. मुलांनी कठीण वाटणाºया गणिताचे उपयोजन करुन गणितीय आकाशदिवे तयार केले. गणित प्रात्याक्षिकातून शिकले की अतिशय सोपे आहे याचा प्रत्यय मुलांना आला.

अर्थात आपला कठीण विषय सोपा करुन मांडण्यासाठी काही उपक्रमशील शिक्षकांचा हा आटापिटा म्हणजे ‘गणितीय आकाशदिवे कार्यशाळा’. रामटेक मध्ये नुकतेच स्व.घनश्यामराव किंमतकर सभागृहात सृष्टी सौंदर्य परिवाराने या अभिनव गणितीय आकाशदिव्यांच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. आता रामटेक शहरातील शेकडो मुलांचे भावविश्व आणि घरे या गणितीय आकाशदिव्यांनी उजळणार आहे.

शाळकरी मुलांना गणित हा रुक्ष आणि कठीण वाटणारा विषय. त्यातही गणितामध्ये भूमितीचा भाग तर आणखीच कठीण वाटतो. अनेक शिक्षकांना देखील आपला विषय मुलांपर्यत सोप्या रितीने कसा न्यावा हा प्रश्न नेहमीच पडत असतो. राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचे उपक्रमशील गणित शिक्षक वेदप्रकाश मोकदम गेल्या दोन वर्षांपासून मुलांना भूमितीय संकल्पनांचा वापर करुन गणितीय आकाशदिवे तयार करण्यासाठी कार्यशाळा घेतात.

त्यांनी या कार्यशाळेचा प्रयोग अगोदर आपल्या घरच्या मुलांवर केला आणि मिळालेले यश पाहून सदर कार्यशाळा गावातील शाळांमधील मुलांसाठी घेण्याचे ठरविले. यावर्षी हा उपक्रम व्यापक प्रमाणावर घेण्यासाठी सृष्टी सौंदर्य बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला. शाळांना पत्र देवून कार्यशाळेसाठी मुलांना पाठविण्याची विनंती करण्यात आली.

नुकतीच रविवार दिनांक ५ नोव्हें रोजी स्व. घनश्यामराव किंमतकर सभागृहात गणितीय आकाशदिवे तयार करण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव रामचंद्र जोशी यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेश बाकडे तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त गणित शिक्षक राधेश्याम गायधने व श्री समर्थ शिक्षण मंडळाचे सचिव व सृष्टी सौंदर्य संस्थेचे अध्यक्ष ऋषीकेश किंमतकर उपस्थित होते. भूमितीमध्ये व्दिमीतीय आणि त्रिमितीय आकृत्यांचा अभ्यास वर्ग ५ वी पासून १० पर्यंत क्रमाक्रमाने येत जातो.

नेमका हाच मुद्दा हेरुन बहुभुजाकृती आणि गणितीय संकल्पनेनुसार व्दिमीतीय आणि पुढे त्रिमितीय आकृत्या कशा तयार होतात, शिरोबिंदू,बाजू ,पुढे त्रिकोण,चौकोन,पंचकोन.षटकोन यासारख्या आकृत्या आणि त्यापासून तयार होणाºया त्रिमितीय आकृत्या त्रिकोणी सुची(पिरॅमिड),प्रिझम, क्युब,आक्टॅहॅड्रॉन,आयकोसाहॅड्रॉन,डोडेकाहॅड्रॉन,ट्रंकेटेड टेट्राहॅड्रॉन,ट्रंकेटेडआॅक्टाहॅड्रॉन,ट्रंकेटेडटेट्राहॅड्रॉन याप्रकारे ७५ प्रकारच्या त्रिमितीय आकृत्या तयार करता येतात.कार्यशाळेत यापैकी १६ प्रकारच्या आकृत्या गणितीय आकाशदिवे म्हणून तयार करुन घेण्यात आल्या.

यासाठी सेंचुरी पेपर,कात्री,फेविकॉल आणि स्टेपलरचा वापर करण्यात आला. एकूण ११० मुलांनी कार्यशाळेत भाग घेतला. हे आकाशदिवे तयार करताना मुलांनी निर्मितीचा आनंद घेतला व ते कार्यशाळेत रंगून गेले. तयार झालेले हे आकाशदिवे मोठ्या दिमाखात मुले घरी घेवून गेले.

आता दिवाळी मध्ये शहरातील ११० घरांवर हे गणितीय आकाशदिवे डौलाने झळकणार आहे व येणाºया जाणाºयांचे लक्ष देखील वेधणार आहे. मुलांचे भावविश्व आणि त्यांचे आकाश देखील हे आकाशदिवे उजळवून टाकणार आहे. कार्यशाळेला प्रशिक्षित मार्गदर्शक म्हणून अश्विनी बरबटे,सुचिता मोकदम,भारती खंते,माधुरी शेळके,सुजाता रहाटे,निशा बाकडे,

भार्गव मोकदम,सर्वज्ञा मोकदम,मधुरा हटवार,श्रृती टेकाम,खुशी रेहकवार,लेशिका बाकडे यांनी मार्गदर्शन केले. वयोजेष्ठ रविकाका,सारंग पंडे,आनंद खंते,भुषण देशमुख यांनी कार्यशाळेला मदत केली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: