Saturday, December 21, 2024
Homeराज्यमोदी सरकार विरोधात जनतेत प्रचंड संताप; विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा...

मोदी सरकार विरोधात जनतेत प्रचंड संताप; विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय पक्का: नाना पटोले…

नेहरु, गांधी परिवारावर टीका करुन पापे लपवण्याचा भाजपाचा प्रयत्न; महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

भाजपा उमेदवारांकडून आचारसंहितेचा भंग, खर्चाच्या मर्यादाही ओलांडल्या; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; गोंदियात नाना पटोलेंची पदयात्रा.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने हातात घेतली असून काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा आशिर्वाद मिळाला आहे. विरोधी पक्षांच्या उमेदवाराला लोकांनी अनेक गावातून हाकलून लावले.

१० वर्षातील अत्याचारी कारभाराला जनता कंटाळली आहे. मोदी सरकारविरोधात जनतेमध्ये तीव्र संताप असून विदर्भातील पाचही जागांवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

भंडाऱ्यात पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, केंद्रातील तानाशाही सरकारने १० वर्षात देशाची संपत्ती विकून देश चालवला, देश कर्जबाजारी करून ठेवला, तरुणांचे जीवन बरबाद केले, शेतकऱ्यांना उद्धवस्त केले, महागाई, बेरोजगारी या ज्वलंत विषयावर भाजपाचे नेते बोलतच नाहीत, हा राग जनतेच्या मनात आहे.

मोदी सरकारचा कारभार पाहून जनतेने त्यांचा निर्णय पक्का केला असून परिवर्तन होणार असे चित्र विदर्भातील पाचही मतदारसंघात दिसले. काँग्रेस पक्षाने जाहीर सभा, चौक सभा घेण्याबरोबरच घरोघरी जाऊन ५ न्याय व २५ गॅरंटीची माहिती लोकांपर्यंत पोहचवली. काँग्रेस पक्षाने दिलेली गॅरंटी जनतेचे कल्याण करणारी आहे तर मोदी गॅरंटी ही भ्रष्टाचारी लोकांना वाचवणारी आहे. भ्रष्ट लोकांना ईडी, सीबीआयकडून दबाव आणून भाजपात प्रवेश द्यायचा व वॉशिंगमधून त्यांना स्वच्छ करण्याचे काम भाजपाने केले आहे.

भाजपाच्या उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग केला, खर्चाची मर्यादाही ओलांडली असून त्यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने मतविभाजनाचा प्रयत्न केला असला तरी त्यात त्यांना यश येणार नाही. काँग्रेस व गांधी, नेहरु परिवारावर आरोप करून भाजपा सत्तेत आले परंतु १० वर्षात भाजपाने काय केले यावर ते बोलत नाहीत. नेहरु, गांधी परिवारावर टीका करुन भाजपा पापे लपवण्याचा प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

भंडारा-गोंदियाचे इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ गोंदिया शहरात पदयात्रा काढण्यात आली. मामा चौकातून सुरु झालेली ही पदयात्रा नेहरू चौक, आंबेडकर चौक, गांधी चौक, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, चांदणी चौक, शंकर चौक, यादव चौक, रामनगर, पाल चौक ते गुरुद्वारा मरार टोली बस स्टॉप येथे समाप्त झाली.

या पदयात्रेदरम्यान काँग्रेसचे ‘न्यायपत्र’ नागरिकांना देण्यात आले. यावेळी गोंदिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष मा. आ. दिलीप बनसोडे, गोंदिया काँग्रेस शहराध्यक्ष योगेश अग्रवाल, तालुकाध्यक्ष रमेश अंबुले, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याआधी सकाळी नाना पटोले यांनी डब्बा ता. अर्जुनी येथे कॉर्नर सभेला संबोधित केले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: