Monday, December 23, 2024
HomeHealthहिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची काळजी कशी घ्याल…

हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची काळजी कशी घ्याल…

डॉ.अजय विलासराव अवचार
गुरुकृपा हॉस्पिटल, चिखली

हिवाळा हा स्वभावताच शीत हवामानाचा असतो त्यामुळे शरीरातील संतुलन राखण्यासाठी उष्ण गुणात्मक आहाराचा समावेश हिवाळ्यामध्ये करणे गरजेचे असते, उष्ण विर्यात्मक आहाराच्या सेवनाने शरीरातील अग्नी प्रदीप्त होतो त्यामुळे भूक जास्त लागण्यास मदत होते व शिवाय अन्नाचे सम्यक पचनही होते. हिवाळ्यामध्ये गुरु स्निग्ध उष्ण गुणात्मक आहार घ्यावा.

हिवाळ्यातील आपला आहार कसा असावा तसेच हिवाळ्यात काय खावे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

एकीकडे वातावरणात बदल होत असतानाच दुसरीकडे शरीरातही अनेक बदल घडत असतात. त्वचा आणि केस कोरडे होणे, जास्त भूक लागणे, कमी तहान लागणे आदी बदल होतात.
हिवाळ्यात अन्नपचन लवकर होत असते. त्यामुळे भूकही अधिक वेळा लागते. जसा हा ऋतू व्यायामाला उत्तम, तसाच तो पचनासाठी पण उत्तम. हवेतील बदलामुळे काहींना सर्दी, ताप, खोकला आदी संसर्ग होण्याची भीती असते आणि त्यामुळे या दिवसांत आपली प्रतिकारशक्ती चांगली राहण्याची गरज असते.

त्वचा आणि केस कोरडे पडत असल्यावर जसे बाहेरील शरीरावर उपाय केले जातात, त्याचप्रमाणे आंतर शरीराचीही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

पाणी
या दिवसात मुख्य म्हणजे पाणी कमी प्यायले जाते. पाणी कसे जास्त प्यायले जाईल, याची काळजी घ्यायला हवी. थंड पाण्याऐवजी साधे पाणी, गरम किंवा कोमट पाणी, सूप, ग्रीन टी असे शरीराला गरमपणा देणारे पदार्थ आहारात घ्यावेत.

दुग्धजन्य पदार्थ

हिवाळ्यात दूध, तूप, लोणी, यांचा आहारात समावेश करावा यामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्धता,कॅलरीज असतात त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास मदत होते.

त्वचा कोरडी पडू नये म्हणून आहारात योग्य प्रमाणात तेल, तूप, लोणीचा समावेश असावा. आवश्यक चरबीयुक्त पदार्थही शरीरात जाणे गरजेचे आहे. तेलासोबतच खोबरे, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या बिया याचाही आहारात समावेश करावा. त्वचा आणि केसाचा कोरडेपणा घालवण्यासाठी तेलाप्रमाणेच जीवनसत्त्व ई, ओमेगा, झिंक, सेलेनियम हेही आवश्यक असतात.

मसाला
मसाल्याचे पदार्थ हे उष्ण विर्याचे असतात त्यामुळे आहारामध्ये तीळ,लसूण,मिरी, मोहरी,लवंग,जिरे,आले,हिंग तमालपत्र,इत्यादी मसाला वापरावा मिरी,लसूण आणि तूप घालून चटणी करावी जिर्याची ताकाला फोडणी देऊन ते ताक प्यावे हिवाळ्यात आपल्याला आहारात तिळाचे लाडू,तिळाची चटणी, तिळगुळ यांचा जरूर समावेश करावा.

सुकामेवा
बदाम,काजू,मनुका,अक्रोड,पिस्ता इत्यादी सुकामेवा स्निग्ध उष्णविर्यात्मक असल्याने त्याचा आहारात समावेश करावा.

आवळा
या दिवसात आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळ्यात जीवनसत्व सी असते, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, पचन चांगले होते आणि केस आणि डोळेही चांगले राहतात. घरी केलेला ताजा आवळारस अतिशय उत्तम! या दिवसात घरी आवळा किसून त्याची सुपारी किंवा सेंद्रिय गूळ वापरून त्याचा मोरावळा तयार करू ठेवता येऊ शकतो. या दिवसात अनेक ताज्या भाज्या, फळे येतात. संत्री, मोसंबी, गाजर आणि इतर फळे, पालेभाज्या यातदेखील अधिक प्रमाणात जीवनसत्त्व सी आणि अ असते. हे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते.

हिवाळ्यात आहारामध्ये कोणत्या बाबी खाऊ नयेत असे पदार्थ फार कमी आहेत. त्यामुळे समतोल आहार हाच उत्तम आहार. मात्र ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा नियम लागू होत नाही. आहार आणि व्यायाम यांचा योग्य मेळ साधल्यास वजन कमी करणेही शक्य आहे. या दिवसांत खूप भूक लागते म्हणून जंक किंवा फास्ट फूडवर भर न देता घरी तयार केलेले पदार्थ पोटभर खावेत. वजन वाढवण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा उत्तम काळ आहे.

या काळात हरभरे, हुरडा, हिरवे वाटाणे, लालबुंद गाजर, स्ट्रॉबेरी, तुती अशा अनेक रंगीबेरंगी डोळ्यांना सुखावणाऱ्या नैसर्गिक पदार्थाची बाजारात रेलचेल दिसते. तेव्हा यातील अधिकाधिक पदार्थाचा आहारात समावेश करावा.

आपल्यापैकी बरेच जण अशी आहेत जे तरुण दिसतात मात्र त्यांचा चेहरा चमकदार दिसत नाही. तसंच अगदी लहान वयातच त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याच्या त्रासाला हमखास अनेकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हिवाळ्यात आपण आपल्या आहारात काही खास फळांचा आणि पदार्थांचा समावेश केला पाहिजे –

दही
दह्यापासून तयार केलेला रायता आणि लस्सी तुमच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. हेच दही तुमच्या त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे. दह्यामध्ये तांदळाचे पीठ किंवा चन्याचे पीठ मिसळून ते चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग दूर होतील.

लिंबू
लिंबाचा रस केवळ आपल्या पोटासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. दररोज लिंबाचे पाणी पिण्यामुळे आपल्या पोटाच्या समस्या दूर होतात. तसेच, तुम्ही लिंबाचा रस पाणी किंवा ग्लिसरीनमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. त्यामुळे चेहरा चमकदार बनतो.

दूध
दूधाला संपूर्ण आहार म्हणतात. दररोज किमान दोन ग्लास दूध प्यायला पाहिजे. तुम्ही सकाळी आणि रात्री एक-एक ग्लास दूध पिऊ शकता. चेहऱ्यावर कच्चे दूध लावल्यामुळे चेहरा मऊ होतो.

सफरचंद
जेवणात दररोज एक सफरचंद खाल्ले पाहिजे. तसेच, तुम्ही सफरचंदाचा रस चेहऱ्यावर लावू शकता. सफरचंदापासून व्हिनेगर देखील तयार करतात. सफरचंदाचा रस चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर असतो. थंडीत मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर असतातच पण त्यामुळे थंडीपासून रक्षणही होतं. थंडीतल्या सर्दी, खोकला, फ्लू अशा आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येतं.

ग्रीन टी
ग्रीन टी चं सेवनही थंडीत उपयुक्त ठरतं. कारण ग्रीन टीमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट असतात. यामुळे अनेक बॅक्टेरियांचा प्रभाव कमी होतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती वाढायला अँटिऑक्सिडंट मदत करतात.

लसूण
हिवाळ्यात लसूण खाणं चांगलं. लसणामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसंच रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

मध
गरम दुधात मध घालून प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. थंडीत दुधात सारखाऐवजी मध घालावा.

हिरव्या भाज्यांमधली अ आणि क ही जीवनसत्त्वं थंडीत आरोग्यासाठी लाभदायी ठरतात.

संत्री, द्राक्षं अशी फळांमध्ये क जीवनसत्त्वं असतं. यामुळे त्वचेचं पोषण होतं. कोलेस्टरॉल कमी करण्यासोबतच ही फळं चयापचय क्रिया ही वाढवतात.

या दिवसात प्रथिनयुक्त आहार घ्यावा. ब्रेड, पांढरा भात असे पदार्थ टाळावे.

गोड पदार्थ, शीतपेय, दुग्धजन्य पदार्थ याचं सेवनही प्रमाणातच करावं. सर्दी, खोकला असेल तर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: