Sunday, November 17, 2024
Homeराजकीयकैदेतील सचिन वाझेला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी? वाझेच्या बंदोबस्तातील पोलीसांना निलंबित करा...

कैदेतील सचिन वाझेला मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी? वाझेच्या बंदोबस्तातील पोलीसांना निलंबित करा : अतुल लोंढे…

भाजपाकडून सरकारी यंत्रणांचा पुन्हा गैरवापर, सचिन वाझेचा बोलविता धनी कोण?

अनिल देशमुख, श्याम मानवांनी देवेंद्र फडणवीसांचा बुरखा फाडल्यानंतर वाझे कसा प्रकटला.

निलंबित पोलीस अधिकारी व सध्या गंभीर गुन्ह्याखाली कैदेत असलेल्या सचिन वाझेनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करण्यामागे कोणती शक्ती आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कोठडीत असलेल्या आरोपीला मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही मग सचिन वाझेलाच मीडियाला बोलण्याची परवानगी कोणी दिली, याची चौकशी झाली पाहिजे तसेच सचिन वाझेच्या बंदोबस्तासाठी जे पोलीस होते त्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा कसा गैरवापर करते हे आम्ही वारंवार उघड केले आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीरसिंह यांच्या माध्यमातून भाजपाने मविआ सरकारमधील नेत्यांवर खोटे आरोप करुन त्यांना गोवण्यासाठी षडयंत्र रचले होते. आताही माजी गृहमंत्री अनिल देशमुख व श्याम मानव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलखोल केल्याने फडणवीस यांचा भ्रष्ट चेहरा उघडा पडला, आपले बिंग फुटले असून, असत्य लपवण्यासाठी कैदेत असलेल्या सचिन वाझेला पुढे करण्यात आले आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल खोट्या गुन्ह्याखाली जेलमध्ये आहेत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकले होते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री नबाव मलिक हे सुद्धा जेलमध्ये होते पण त्यांना मीडियाशी बोलण्याची परवानगी नाही मग सचिन वाझेलाच मीडियाशी बोलण्याची परवानगी कशी व ती कोणी दिली, हा सचिन वाझे सरकारचा कोण लागतो, अशी विचारणाही अतुल लोंढे यांनी केली आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: