Monday, December 23, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला..?

देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला..?

पहाटेचा शपथविधी नव्हे तर जनतेचे मुलभूत प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे !: नाना पटोले

ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवणे ही भाजपाची खेळी.

मुंबई – पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असे प्रश्न विचारून काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे मुलभूत प्रश्न महत्वाचे आहेत व त्यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत, असे महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्याची आज काय अवस्था झाली आहे? कापूस, कांदा, सोयाबीनचे दर घसरले आहेत आणि केंद्र सरकार कापसाच्या गाठी आयात करत आहे. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी दररोज आत्महत्या करत आहे,

गरिबांच्या पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही, आमदार सुरक्षित नाहीत, जनता सुरक्षित नाही आणि निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी फुसकी सोडून लोकांना मुळ मुद्द्यापासून दुसरीकडे वळवायचे ही भाजपाची खेळी आहे पण जनतेला भाजपाची ही खेळी समजल्याने आता हे चालणार नाही.

२०१९ साली सरकार स्थापनेवेळी काय झाले यावर आज चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. या घटनेला खूप कालावधी लोटला आहे, त्यावर चर्चा करण्याची ही काही वेळ नाही. असेच असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ साली काय झाले होते तेही सांगावे, त्यावेळी शिवसेनेचे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले होते, सत्तेसाठी भाजपा काहीही करते.

आताही राज्यात असंवैधानिक सरकार आहे, या शिंदे-फडणवीस सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे, शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, जनतेचा विश्वासघात केला आहे. महागाईने जगणे कठीण झाले आहे. तरुणांना बेरोजगारीच्या खाईत लोटले आहे. या प्रश्नांवर सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे पण त्याकडे हे सरकार लक्ष देत नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: