नाशिक सिन्नर जवळ शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेगवान कारने दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून यात ३ मुलींचा मृत्यू झाला तर ४ जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील एका नामांकित कॉलेजचे 8 ते 9 विद्यार्थी स्विफ्ट कारमधून मित्राच्या लग्नाला गेले होते. सायंकाळी नाशिकला परतत असताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ त्यांच्या गाडीचा टायर अचानक फुटला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार सरळ दुभाजकावर पलटी होऊन सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा व स्विफ्ट कारला धडकली. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मरण पावलेले सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी होते.
माहितीनुसार, या अपघातातील तीन मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली असून इतर दोघांची ओळख अजूनही पटलेली नाही. सायली पाटील, प्रतीक्षा दगू घुले आणि शुभम तायडे यांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अन्य जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघातातील जखमींची नावे :
साक्षी नितीन घायाळ
साहिल गुणवंत वारके
गायत्री फरताळे
सुनील ज्ञानेश्वर दळवी
जखमींवर सिन्नर आणि नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांचीही मृत्यूशी झुंज सुरु आहे. या अपघातातामुळे पाच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जातेय.