लाठीचार्जचे व्हीडीओ डिलीट करण्यासाठी सरकारकडून मीडियावर दबाव.…वारकऱ्यांना खोटे ठरवून वारीची बदनामी करण्याचा फडणवीस भाजपचा प्रयत्न.…वसुलीबाज कृषी मंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा…
मुंबई – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. वारकरी स्वतः पोलिसांनी केलेला अत्याचार सांगत आहेत परंतु राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र ते दिसत नाही.
लाठीचार्जचे व्हीडीओ डिलीट करण्यासाठी आता सरकारकडून मीडियावर दबाव आणला जात आहे आणि दुसरीकडे लाठीहल्ला झालाच नाही, असे फडणवीस निर्लज्जपणे सांगत आहेत, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
टिळक भवन दादर येथे माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शेकडो वर्षांपासून चालत आलेली वारकरी परंपरा दरवर्षी शांततेत पार पडते. वारक-यांच्या नियोजनाची आणि शिस्तीची जगभरात दखल जाते पण काल आळंदीत पोलीसांच्या मुजोरपणामुळे वारीला गालबोट लागले.
काही कारण नसताना पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीमार केला हे स्पष्ट दिसत आहे. मग लाठीमार झालाच नाही असा खोटा दावा करुन गृहमंत्री फडणवीस काय सिद्ध करु पहात आहेत? विरोधक राजकारण करत असल्याचा फडणवीसांचा आरोप हास्यास्पद आहे.
आळंदीतील वारकऱ्यांवरील पोलीस लाठीहल्ला प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधाने ही बेजबाबदारपणाची, संवेदनाशून्य असून ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार आहे.
#WATCH | Maharashtra: A scuffle broke out between warkaris (Lord Vitthal followers) and police during a procession in the Pune district yesterday
— ANI (@ANI) June 11, 2023
Some local youths tried to forcibly enter the Palkhi procession, leading to an altercation with the police. No lathi charge or force… pic.twitter.com/0GNkpGTzSs
वारकऱ्यांची डोकी फोडता आणि वरून जनतेच्या भावना भडकवू नका, म्हणून उपदेश कसले करता? तुम्हाला गृहविभाग सांभाळता येत नाही त्या अपयशाचे खापर वारक-यांवर कशाला फोडता?
आळंदीत झालेला प्रकार महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी परंपरेला काळीमा फासणारा आहे. भारतीय जनता पक्षाला खोटे बोल, पण रेटून बोलची विकृती जडलेली आहे. त्याच मुशीत तयार झालेल्या फडणवीसांना आळंदीतला पोलीस अत्याचार दिसत नाही हे कोडगेपणाचे लक्षण आहे.
स्वतःचे अपयश झाकण्यासाठी फडणवीस आता वारक-यांना दोष देऊन वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत भाजपाचा आयटी सेल वारकऱ्यांनाही खोटे ठरवू लागला आहे.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही. शिंदे फडणवीस सरकारने आळंदीत वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, असेही पटोले म्हणाले.
वसुलीबाज कृषी मंत्री अब्दुल सत्तारची हकालपट्टी करा…
अकोल्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नावाने कृषी विभागाने धाडी टाकून व्यावसायिकांकडून पैसे मागितल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या धाड पथकात कृषीमंत्री अब्दूल सत्तारांचा स्विय सहायक दिपक गवळी सह इतर अनेक खाजगी लोकांचा समावेश होता.
तर आपल्याच सांगण्यावरून या धाडी टाकण्यात आल्या आहेत, त्यात चुकीचे काहीच झाले नाही असे कृषीमंत्री स्वतःच सांगत आहे. यावरून ते किती निर्ढावलेले आहेत हे दिसून येते.
अब्दुल सत्तार यांना शेतकऱ्यांबद्दल अजिबात चिंता नाही. त्यांनी मंत्री झाल्यापासून आतापर्यंत शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतला नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतक-यांना धीर दिला नाही अडचणींच्या काळात मदत केली नाही. याऊलट सातत्याने बेजबादार विधाने करून शेतक-यांचा आणि कष्टक-यांचा अवमान केला आहे.
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतक-यांना खते व बियाणे वेळेवर मिळाली पाहिजे याची व्यवस्था करण्याऐवजी कृषीमंत्री आणि त्यांचे कार्यालय धाडी घालून वसुली करण्यात गुंग आहे हे अतीशय गंभीर आहे. या वसुलीबाज कृषीमंत्र्यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.