संजय आठवले आकोट
संपूर्ण देशात घराघरांवर राष्ट्रीय ध्वज फडकविण्याकरिता केंद्र सरकारने ध्वज फडकविणे संदर्भातील नियम शिथिल केले आहेत. मात्र तरीही ध्वजारोहण करताना नागरिकांकडून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होऊ नये याची काटेकोर खबरदारी घेणे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे. मात्र या संदर्भातील नियमांची सामान्य नागरिकांना माहितीच नसते. त्यामुळे ह्या ध्वजारोहणात चुका होऊ शकतात याची जाणीव ठेवून नागरिकांना ध्वजारोहणाची ध्वजसंहिता माहीत होण्याकरता महा व्हाईसने ती उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणे वर्तन करून नागरिकांनी राष्ट्रीय ध्वजारोहणाचे आपले आद्य कर्तव्य अनुशासन पूर्ण रीतीने पार पाडावे असे आवाहन महाव्हाईस करीत आहे.
भारतीय ध्वजसंहिता
विविध प्रसंगी निरनिराळ्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारतात. राष्ट्रध्वज लावण्याची योग्य पद्धत कोणती याविषयी संपूर्ण माहिती असणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे या बाबतीत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी या संहितेत एकत्र केल्या आहेत.
सरकारी रीत्या ध्वज लावण्याच्या सर्व प्रसंगी, भारतीय मानक संस्थेने (इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन) ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार तयार केलेला आणि त्या संस्थेचे प्रमाणचिन्ह असलेला ध्वजच वापरण्यात यावा. इतर प्रसंगीसुद्धा केवळ अशाच प्रकारचे योग्य आकाराचे ध्वज लावले जाणे इष्ट आहे. प्रसंगाच्या महत्त्वानुसार योग्य त्या आकाराचा ध्वज निवडण्यात यावा. ४५०X३००मि.मी. आकाराचा ध्वज अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या विमानावर, २२५X१५०मि.मी. आकाराचा मोटारींवर आणि लहान आकाराचा ध्वज (१५०X१००मि.मी.) टेबलावर लावण्यासाठी असतो.
ध्वज लावण्याची योग्य पद्धत :-
(१) ज्या ज्या ठिकाणी ध्वज उभारतात अशा प्रत्येक ठिकाणी तो उच्च स्थानी आणि स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे.
(२) जेथे कोणत्याही सरकारी इमारतींवर ध्वज लावण्याची प्रथा आहे.तेथे त्या इमारतींवर रविवार व सुटीचे दिवस धरून सर्व दिवशी ध्वज लावण्यात येईल आणि या संहितेमध्ये उपबंधित केले असेल ते खेरीजकरून, हवामान कसेही असले तरी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज लावण्यात येईल. अशा इमारतीवर रात्रीसुद्धा ध्वज लावता येईल. मात्र काही अगदी प्रसंगीच तो रात्री लावावा.
३)ध्वजारोहणाचे वेळी ध्वज नेहमी झर्रकन वर चढवावा आणि उतरविताना मात्र तो सावकाशपणे व विधिपूर्वक उतरविण्यात यावा. ध्वजारोहण व ध्वजावतरण जेव्हा बिगुलच्या प्रसंगोचित सुरांवर करावयाचे असेल अशा वेळी ध्वज चढविण्याची आणि उतरविण्याची क्रिया त्या सुरांच्या बरोबरच झाली पाहिजे.
(४)जेव्हा खिडकीची कड, सज्जा किंवा इमारतीचा पुढील भाग अशा ठिकाणी आडव्या किंवा तिरक्या बसविलेल्या काठीवरून ध्वज फडकविण्यात येतो तेव्हा ध्वजाची केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकडे असावी.जर ध्वज इतर प्रकारे म्हणजे भिंतीवर सपाट व आडवा लावण्यात आला असेल तर ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वांत वर असावा.
५)जर ध्वज उभा लावण्यात आला असल्यास ध्वजाची केशरी रंगाची बाजू त्याच्या (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावी म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावी.
६)पूर्व-पश्चिम अगर दक्षिणोत्तर जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी ध्वज लावताना तो उभा लावावा व त्याची केशरी रंगाची बाजू पूर्व पश्चिम रस्त्यावर उत्तरेकडे आणि दक्षिणोत्तर रस्त्यावर पूर्वेकडे असावी. एखाद्या व्यासपीठावर ध्वज लावावयाचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजवीकडे काठीवर ध्वज लावण्यात यावा अथवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या वरच्या बाजूस लावावा.पुतळ्याच्या अनावरणासारख्या प्रसंगी ध्वज लावताना तो स्पष्ट दिसेल अशा वेगळ्या जागी लावण्यात यावा.
कोणत्याही पुतळ्याचे किंवा स्मारकांचे आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करू नये.ध्वज मोटारीवर लावावयाचा असल्यास तो मोटारीच्या पुढे बॉनेटच्या मध्यावर मजबूतपणे बसवलेल्या सळईवर लावण्यात यावा.
मिरवणुकीत अथवा संचालनाच्या वेळी ध्वज फडकत न्यावयाचा असल्यास तो चालणाऱ्यांच्या उजव्या म्हणजेच खुद्द ध्वजाच्या उजव्या बाजूस असावा किंवा अशा प्रसंगी इतर आणखी ध्वजांची रांग असल्यास तो त्या रांगेच्या मध्यभागी पुढे ठेवावा.
ध्वजाचा चुकीचा वापर :-
(१) फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावता कामा नये.
(२) एखाद्या व्यक्तीस अगर वस्तूस मानवंदना करण्यासाठी ध्वज खाली आणू नये.
3) दुसरा कोणताही ध्वज किंवा पताका राष्ट्रध्वजाच्या वरच्या बाजूस किंवा राष्ट्रध्वजावर आणि पुढे नमूद केलेले काही अपवाद सोडल्यास त्याच्या बरोबरीने लावू नये. तसेच ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालू नयेत अथवा ध्येयचिन्ह लावू नये.
४) तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा शोभेसाठी ध्वजाचा कोणत्याही प्रकारे उपयोग करू नये. त्याचप्रमाणे इतर रंगीत कापडाचे तुकडे राष्ट्रध्वजासारखे दिसतील अशा तऱ्हेने जोडू नयेत. वक्त्याचे टेबल झाकण्यासाठी अथवा व्यासपीठावर आच्छादनअथवा पडदा म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करू नये. केशरी रंगाचा पट्टा खाली येईल अशा रीतीने ध्वज लावू नये.
ध्वजाचा स्पर्श जमिनीस होऊ देऊ नये अथवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये.
ध्वज फाटेल अशा पद्धतीने फडकवू नये अथवा बांधू नये.
गैरवापर:-
(१) ध्वजाचा कोणत्याही स्वरूपात आच्छादन म्हणून वापर करता कामा नये. सरकारमार्फत अथवा सेनादलांमार्फत काढण्यात येणाऱ्या अंत्ययात्रांचे प्रसंग यास अपवाद असतील, असे प्रसंग पुढे दिले आहेत.
(२) वाहन अथवा रेल्वेगाडी अथवा जहाज यांच्या झडपांवर, छतांवर, बाजूंवर अथवा पाठीमागच्या बाजूस आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करू नये.
(3)ध्वज फाटेल किंवा तो मलीन होईल अशा प्रकारे वापरू नये किंवा ठेवू नये.
४) ध्वज फाटला असेल अथवा मळल्यामुळे खराब झाला असल्यास तो कुठेतरी फेकून देऊ नये अथवा त्याचा अवमान होईल अशा रीतीने त्याची विल्हेवाट लावू नये अशा परिस्थितीत ध्वज खाजगीरित्या शक्य तर जाळून किंवा त्याचा मान राखला जाईल अशा इतर प्रकाराने सबंध च्या सबंध नष्ट करावा.
५) छताचे आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करू नये
६) पोशाखाचा अथवा इतर कोणत्याही प्रकारच्या गणवेशाचा भाग म्हणून ध्वजाचा वापर करू नये. तसेच उशा, हात रुमाल यावर त्याचे भरत काम करू नये अथवा हात पुसण्याचे रुमाल किंवा पेट्या यावर त्याची छपाई करू नये.
७) ध्वजावर कोणतीही अक्षरे लिहू नयेत.
८) जाहिरातीच्या कोणत्याही स्वरूपात ध्वजाचा वापर करू नये अथवा ध्वजस्तंभाचा जाहिरात लावण्यासाठी म्हणूनही वापर करू नये.
९) काही देण्यासाठी घेण्यासाठी बांधण्यासाठी अथवा वाहून नेण्यासाठी साधन म्हणून ध्वजाचा वापर करू नये.