Monday, December 23, 2024
Homeराजकीय"हिवरखेड नगरपंचायत की नगरपरिषद" भाजप उमेदवार डॉक्टर रणजीत पाटलांनी भूमिका स्पष्ट करावी…अन्यथा...

“हिवरखेड नगरपंचायत की नगरपरिषद” भाजप उमेदवार डॉक्टर रणजीत पाटलांनी भूमिका स्पष्ट करावी…अन्यथा मतदानावर बहिष्कार…हिवरखेडकरांची मागणी

आकोट- संजय आठवले

हिवरखेड नगरपंचायत चा मुद्दा दिवसागणिक उग्र स्वरूप धारण करीत असून या मुद्द्यावर एकमूठ झालेल्या हिवरखेडकरांनी या मुद्द्यावरून अमरावती विभाग पदवीधर निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना टार्गेट केले आहे. हिवरखेड नगरपंचायत की नगरपरिषद यावर आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन हिवरखेडकरांनी डॉक्टर रणजीत पाटील यांना केले आहे. त्यामुळे हिवरखेडकरांनी मतदानालाच आपले अस्त्र बनविल्याचे दिसत आहे.

हिवरखेड नगरपंचायत मुद्द्यावर हिवरखेड चे माजी सैनिक संघाने समर्थनाची व उग्र आंदोलनाची आपली भूमिका यापूर्वीच जाहीर केलेली आहे. त्यात आता अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत भाजपाकडून डॉक्टर रणजीत पाटील यांना उमेदवारी दिली गेली आहे. योगायोगाने ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात मानले जातात. फडणवीसांकडे त्यांच्या शब्दाला मोठे वजन आहे. अशा स्थितीत हिवरखेड माजी सैनिक संघात अनेक पदवीधर आहेत. त्यासोबतच हिवरखेड परिसरात अन्य पदवीधरही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात बहुतांश पदवीधर डॉक्टर रणजीत पाटील यांना मानणारे आहेत. जनमानसाच्या भावनांचा आदर करणारे म्हणून डॉक्टर पाटील यांचे कडे पाहिले जाते. त्यामुळे हिवरखेड येथे त्यांना भक्कम मतदानाची खात्री आहे.

असे असले तरी मात्र डॉक्टर रणजीत पाटील यांना होणाऱ्या ह्या मतदानामध्ये भाजपाचेच आमदार प्रकाश भारसाखळे यांचे मुळे मोठा अडसर निर्माण झाला आहे. आज रोजी हिवरखेडकरांची मागणी नगरपंचायतीची आहे. त्या मुद्द्यावर जात, धर्म, पंथ, पक्ष बाजूला सारून अख्खे हिवरखेडकर एकवटलेले आहेत. परंतु आमदार भारसाखळे यांनी हिवरखेड नगरपंचायत होण्यावर स्थगिती आणून हिवरखेडकरांशी मोठी दगाबाजी केली आहे. सोबतच त्यांना नगरपरिषदेचे गाजर दाखविले आहे. त्याने प्रत्येक हिवरखेडवासी संतापलेला आहे. त्यांचा हा संताप लोभात परिवर्तित करण्याकरिता हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायतीत परिवर्तित करण्यावर भारसाखळे यांनी आणलेली स्थगिती उठवावी लागणार आहे. ही स्थगिती देवेंद्र फडणवीसांमुळेच मिळालेली आहे. तेच तिला उठवूही शकतात. मात्र त्याकरिता तेवढ्याच “तोलामोलाचा मसीहा” हवा आहे. पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने डॉक्टर रणजीत पाटील यांच्या रूपात “तो मसीहा” हिवरखेडकरांना आयताच गवसला आहे.

त्यामुळेच हिवरखेड माजी सैनिक संघ व येथील पदवीधर यांनी भाजप उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांना हिवरखेड नगरपंचायत की नगरपरिषद याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जर नगरपरिषद म्हटले तर ते आमदार भारसाखळेंच्या दगाबाजीचे समर्थक समजले जाणार आहेत. परंतु त्यांनी नगरपंचायत म्हटले तर त्यांना आपले सारे वजन खर्ची घालून भारसाखळे यांनी आणलेली स्थगिती उठवावी लागणार आहे. त्यामुळे डॉक्टर रणजीत पाटील नगरपंचायतीच्या पारड्यात आपले वजन टाकून हिवरखेडकरांची मते मिळवितात की नगरपरिषदेला कौल देत प्रकाश भारसाखळे यांच्याशी भाईचारा दाखवून त्यांची पाठराखण करतात हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: