अकोला – जिल्हयात अनेक भागांमध्ये मंगळवार, बुधवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर आता शेतकर्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अतिवृष्टी बाधित शेतकर्यांना शासनाने त्वरीत मदत देण्याची मागणी पुढे येत आहे. पाऊस न आल्याने त्रस्त असलेला शेतकरी अतिवृष्टीने बेजार झाला आहे. जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागातील शेतात पाणी साचले आहे.
नुकतीच जमिनीबाहेर डोकावू लागलेली पिके या पावसाने पाण्याखाली गेली आहेत. बाळापूर तालुक्यातील काही परिसर जलमय झाला आहे. गेले २४ तासात अकोला व बाळापूर या दोन तालुक्यातील सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जिल्ह्यातील पिकांना जीवदान मिळाले आहे. मंगळवारी बार्शीटाकळी तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे १५ गावातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
मंगळवारी मध्यरात्रीनंतर व बुधवारी पहाटे अकोला आणि बाळापूर तालुक्यातील मुसळधार पाऊस कोसळला. पावसाचा फटका अकोला तालुक्यातील चार तर बळापूर तालुक्यातील दोन मंडळांना बसला आहे. अकोला जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली आहे. बार्शिटाकळी तालुक्यात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने १५ गावांतील पिकांचे नुकसान झाले.
अकोला तालुक्यात चार मंडळात झालेल्या अतिवृष्टीचा फटका २३ गावांना बसला आहे. या गाव परिसरातील १६२४ हेक्टर शेतातीतील सोयाबीन, कापूर आणि तूर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या अहवालात वर्तविला. अतिवृष्टीमुळे अकोला तालुक्यातील १२ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.