६ सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट
धरणांची पातळी ९५४ टक्के पेक्षा जास्त…
नरखेड – भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यामध्ये 5 ते 8 सप्टेंबर या कालावधीत वादळीवारा, वीज व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधीत येलो अलर्ट जारी केला आहे, तथापि 6 सप्टेंबरकरिता ऑरेंज अलर्ट दिलेला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. सध्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांची पातळी 954 टक्के पेक्षा जास्त भरलेली असून मूसळधार पाऊस पडल्यास 1004 केव्हा पण भरून धरणांचे दरवाजे उघडण्यात येऊ शकतात.
या अनुषंगाने नागरिकांनी विषेशतः शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडाखाली उभे राहू नये. नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
नदी, तलाव व धरणे या ठिकाणी नागरिकांनी विशेष: युवकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका. नदी, धरण काठी वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यास वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नका. घडलेल्या घटन व आपत्तीची माहिती तात्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षास द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर व जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर संपर्क क्र: ०७१२-२५६२६६८ येथे संपर्क साधावा.