Heatwave : देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये सुरू असलेल्या कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिउष्णता आणि उष्णतेच्या लाटेच्या समस्येमुळे घातक दुष्परिणाम होत आहेत. आतापर्यंत हजारो लोक उष्माघात आणि उष्माघातामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे बळी ठरले आहेत. या वर्षी 1 मार्च ते 18 जून या कालावधीत कमालीच्या उष्णतेमुळे किमान 110 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 41,000 हून अधिक लोकांना उष्माघात झाल्याचा संशय आहे, असे आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी गुरुवारी सांगितले.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि भागीदार संस्थांनी संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश या वेळी उष्णतेने सर्वाधिक प्रभावित झालेले राज्य आहे, ज्यामध्ये 36 मृत्यू झाले आहेत. त्यानंतर बिहार, राजस्थान आणि ओडिशामध्ये उष्णतेचे सर्वाधिक दुष्परिणाम दिसून आले आहेत. एकट्या 18 जून रोजी उष्माघाताने सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
वाढत्या उष्णतेमुळे समस्या
उष्णतेमुळे आजारी पडणाऱ्या लोकांची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व रुग्णालयांमध्ये विशेष हीटवेव्ह युनिट्स स्थापन करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी बुधवारी दिले.वाढत्या उष्णतेमध्ये उष्माघाताचा धोका सर्वाधिक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये शरीराचे तापमान खूप वाढते, ज्यावर वेळीच नियंत्रण न केल्यास मृत्यू होऊ शकतो.