बिबट्याच्या पिंजर्यात माणूस अडकला असल्याचा Video सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, तर एका गावात बिबट्याला पकडण्यासाठी लोखंडी पिंजरा लावण्यात आला होता मात्र, बिबट्याऐवजी एक माणूस या पिंजऱ्यात अडकला.
ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील एका गावातील आहे. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो माणूस वनाधिकाऱ्याला पिंजऱ्यातून बाहेर काढण्याची विनंती करताना दिसत आहे. पिंजऱ्यात लोखंडी सळ्या पकडून ही व्यक्ती पिंजऱ्यात खूप अस्वस्थ दिसत असून मदतीसाठी विनवणी करीत आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, बिबट्याला आमिष म्हणून ठेवलेले कोंबडा घेण्यासाठी हा माणूस पिंजऱ्यात गेला. स्थानिक वृत्तानुसार त्याने कोंबडी पकडण्याचा प्रयत्न करताच पिंजरा बंद झाला.
वन विभागाचे अधिकारी राधेश्याम यांनी एएनआयला सांगितले की, “बिबट्या इकडे-तिकडे फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, आम्ही पिंजरा लावला. पिंजरा लावण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही काही काळ बिबट्याचा शोध घेतला.”
तो म्हणाला, “पिंजऱ्यात एक कोंबडा होता. त्या माणसाने आत जाऊन कोंबडा पकडला तेव्हा पिंजरा बंद झाला. त्याला लगेच सोडण्यात आले.”
खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये बिबट्यांचे येणे सर्रास झाले आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील न्यायालयाच्या संकुलात बिबट्या घुसला. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून नंतर बिबट्याला पकडण्यात आले.