औरंगाबाद – ( आनंद चक्रनारायण , जिल्हा प्रतिनिधी) हरीश खंडेराव यांनी आयुष्यभर आंबेडकरी विचारांची पताका आपल्या शिरावर घेऊन आंबेडकरी साहित्याची आंबेडकरी समीक्षा केली आणि आंबेडकरी चळवळ जगली.त्यामुळे हरीश खंडेराव हा एक आंबेडकरी विचार आहे आणि विचार कधीही मरत नसतो. हरीश खंडेराव या आंबेडकरी विचारप्रवाहाचे वाहक आहेत ,असे प्रतिपादन जेष्ठ आंबेडकरी तथा परिवर्तनवादी साहित्यिक आणि समीक्षक प्रा डॉ वासुदेव मुलाटे यांनी औरंगाबादेत केले.
प्रा अविनाश डोळस फाऊंडेशन आयोजित “दिशा चिंतनाची ” या हरीश खंडेराव यांच्या आंबेडकरी साहित्य समीक्षेवरील आनंद चक्रनारायण संपादित संदर्भग्रंथाचे प्रकाशन प्रा डॉ वासुदेव मुलाटे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र औरंगाबाद येथे झाले .याप्रसंगी ते बोलत होते.. विचारमंचावर अध्यक्षस्थानी आंबेडकरी साहित्यिक प्रा डॉ संजय मून तर प्रमुख भाष्यकार म्हणून प्रा डॉ उत्तम अंभोरे आणि प्रा डॉ नवनाथ गोरे ,संदर्भग्रंथाचे संपादक आनंद चक्रनारायण यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलताना डॉ मुलाटे म्हणाले की , साहित्य चळवळीच्या प्रवासामध्ये अनेक स्थित्यंतरे घडून आली .दलित ते आंबेडकरवादी हे सुद्धा एक स्थित्यंतरच आहे. या स्थित्यंतरातील दलित ही विकसनशील अवस्था असून आंबेडकरवादी हा सर्वोच्च नव्हे तर अत्युच्च कळस आहे .आणि ह्या कळसावर पोहोचण्यासाठी स्वतः स्वपरिक्षण केल्याशिवाय शुद्धता येऊ शकत नाही .भलेही वैचारिक मतभेद असतील परंतु पोहोचण्याचा मार्ग तर एकच आहे .शेवटी आंबेडकरी विचारच हा साहित्याचा केंद्रबिंदू आहे.
प्रा डॉ उत्तम अंभोरे म्हणाले की ,मिलिंदभूमि नागसेनवन औरंगाबादमध्ये ज्यांनी आंबेडकरी विचारांचा श्वास घेतला , अबोल असणारे सबोल झाले ,सबोल झालेले वाचू लागले आणि स्वतःच्या मताप्रमाणे लिहू लागले .जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं आणि यातूनच धम्मदीक्षेपूर्वीचं जीवन आणि धम्मदीक्षित झाल्यानंतरचं जीवन आणि या जीवनाचं साहित्य निर्माण झालं .त्याला भले कोणी दलित साहित्य म्हणेल वा आंबेडकरवादी .पण ते त्यांचं त्यांचं अभिव्यक्त होणारं साहित्य आहे .आणि हरीश खंडेराव यांनी केलेली आंबेडकरवादी साहित्याची समीक्षा हा त्यांचा सिद्धांत आहे .हा त्यांचा प्रमेय आहे .
अध्यक्षीय समारोपात प्रा डॉ संजय मून म्हणाले की , “दिशा चिंतनाची”या संदर्भग्रंथाने साहित्य चळवळीसमोर अनेक प्रश्न उपस्थित केलेत .1956 पूर्वीचे जीवन सांगण्याचा काळ हा दलित साहित्यात मोडतो तर त्यापुढील धम्मदीक्षा आणि शिक्षा स्विकारानंतरचा काळ आंबेडकरी साहित्यप्रवाहात मोडतो.
एखादा समूह एखादी संकल्पना स्वीकारतो तर का स्वीकारतो आणि एखादी संकल्पना नाकारतो तर का नाकारतो याचे समालोचन होणे गरजेचे आहे.पन्नास साठ वर्षांपूवी दलित शब्द हा समूहवाचक होता आज तो केवळ एका जातीत बंदिस्त झालेला आहे .हेच भारतातल्या जातिव्यवस्थेचं गमक आहे.
त्यामुळे पुढील पन्नास वर्षात आंबेडकरी वा आंबेडकरवादी हा शब्द वा संकल्पना सुद्धा केवळ एकाजातीपुरती मर्यादित झालेली असेल.भारतीय जातीव्यवस्था प्रत्येक संकल्पनेला प्रत्येक समूहाला विशिष्ठ कालखंडानंतर एका जातीत बंदिस्त करते .त्यामुळे आंबेडकरी वा आंबेडकरवादी समूहाने आपल्या विचारांचा वारसा समृध्द करणारी चळवळ निर्माण करणे गरजेचे आहे .
या प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन अमरदीप शामराव वानखडे प्रास्ताविक प्रा भारत शिरसाट यांनी केले तर आभार डॉ सागर चक्रनारायण यांनी मानले….
या प्रकाशन समारंभास प्राचार्य डॉ आर के क्षीरसागर , प्रा डॉ कमलाकर गंगावणे , आप्पासाहेब जुम्बडे , प्रा डॉ मिलिंदराज बुक्तरे ,प्रा डॉ प्रज्ञा साळवे , कॉ भिमराव बनसोड ,व्हि के वाघ , शकुंतला धांडे ,बी व्हि बिलोलीकर ,विजयकुमार सरकाळे ,प्रा ना तु पोघे ,प्रा पी एन मेश्राम , अँड नेताजी चक्रनारायण ,डॉ रमेशचंद्र धनेगावकर , धनराज गोंडाणे, प्रा डॉ सुधाकर नवसागर ,प्राचार्य एकनाथ खिल्लारे , देवानंद पवार ,अरुण कांबळे ,प्रा अरुण चंदनशिवे ,रवींद्र वाकोडे आदींची उपस्थिती होती… प्रकाशन सोहळा यशस्वीतेसाठी प्रा रमेश वाघ ,चेतन गाडे ,निलेश जाधव ,डॉ मिलिंद आठवले यांनी विशेष प्रयत्न केले.