Hardik Pandya : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचे वाईट दिवस अजूनही संपले नसून ते सुरूच आहेत. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे मायदेशात खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतून आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून तो बाहेर होता. आता पुढील वर्षी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. अहवालानुसार तो 3 सामन्यांच्या मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा T20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
एएनआयच्या वृत्तानुसार, टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर होऊ शकतो. पुढील वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो तंदुरुस्त होऊन मैदानात परतेल अशी अपेक्षा आहे. हार्दिक पांड्या चार सामने खेळल्यानंतर घोट्याच्या दुखापतीमुळे आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडला होता. गोलंदाजी करताना चेंडू थांबवताना तो वाईटरित्या पडला आणि त्यानंतर स्पर्धेतील उर्वरित सामन्यांमध्ये तो खेळू शकला नाही.
19 डिसेंबर रोजी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो पुन्हा फिटनेस मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सूर्यकुमार यादवने T20 संघाचे नेतृत्व केले आणि भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही संघाची कमान या खेळाडूच्या हाती होती. भारताने येथे ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती.
अफगाणिस्तानसोबत टी-20 मालिका
अफगाणिस्तान संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 11 ते 17 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारतासाठी ही शेवटची टी-२० मालिका असेल. पहिला T20 सामना 11 जानेवारीला मोहालीत खेळवला जाणार आहे. दोन्ही संघ १४ तारखेला इंदूरमध्ये खेळणार आहेत. शेवटचा T20 सामना 17 जानेवारीला बंगळुरूमध्ये खेळवला जाईल.