Sunday, December 22, 2024
Homeराज्यगांधीग्राम येथील सुप्रसिद्ध गुळपट्टी उद्योग संकटात, शेकडो हात कामापासून वंचित होण्याची भीती...

गांधीग्राम येथील सुप्रसिद्ध गुळपट्टी उद्योग संकटात, शेकडो हात कामापासून वंचित होण्याची भीती…

आकोट – संजय आठवले

अकोला आकोट मार्गावरील गांधीग्राम येथील पूल खचल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली असून गांधीग्राम येथील सुप्रसिद्ध गुळपट्टी उद्योग ग्राहका विना मोठ्या संकटात सापडला आहे. सर्वत्र रोजगाराची वानवा असताना अचानक संकटात सापडलेल्या या उद्योगाने शेकडो हात कामापासून वंचित होण्याचे दुर्दिन आले आहेत.

अकोला आकोट मार्गावरील गांधीग्राम हे मोक्याचे ठिकाण आहे. अकोला आकोट येथून येजा करणारी प्रवासी मंडळी येथे आवर्जून घटकाभर थांबून श्रमपरिहार करतात. त्यामुळे या ठिकाणाला साहजिकच विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच गुळपट्टी हा येथील अतिशय चविष्ट, लोकप्रिय आणि विशिष्ट खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे येथे थांबा घेऊन येथील गुळपट्टी व त्यासोबत गरमागरम भजे किंवा वडे, समोसे यांचा आस्वाद घेण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही.

स्वतःचे खाणे झाल्यावरही प्रवासी मंडळी येथील गुळपट्टी आवर्जून घरी नेतात. येथील गुळपट्टीची प्रशंसा जिल्हाभर झाल्याने साहजिकच येथील गुळपट्टीस मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली. सुरुवातीला चार-सहा उपहारगृहवालेच हा व्यवसाय करीत असत. परंतु मागणी वाढू लागली तसतसे या गावातील बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे वळले. आणि हळूहळू एकाचे एकविस, पाचाचे पन्नास या न्यायाने शेकडो गुळपट्टी निर्माते व विक्रेते येथे तयार झाले. त्यात भर घालून काहींनी वाहने खरेदी केली.

त्याद्वारे त्यानी शेजारील शहरे व मोठ्या गावांमध्ये जाऊन तेथे घरपोच गुळपट्टी विकणे सुरू केले. अनेक बेरोजगार हाताना हा उद्योग वरदान ठरला. परंतु अचानक निसर्ग राजा कोपला. पूर्णामाय रुसली. परिणामी गांधीग्राम चा पूल नादुरुस्त झाला. नाईलाजाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आणि ह्या सोबतच येथील गूळपट्टी उद्योगाचीही रया गेली. ग्राहकराजाच रोडावल्याने या ठिकाणी गुळपट्टी तयार करणे जवळ जवळ बंद झाले आहे.

चालू कामच असे बंद पडल्याने, शेकडो तरुण आता पुढे काय? अशी प्रूच्छा दिनवाण्या चेहऱ्याने एकमेकांना करीत आहेत. परंतु याचे नेमके उत्तर कोणापाशीही नसल्याने हा मार्ग पूर्ववत रहदारीचा होईपर्यंत गांधीग्राम येथील शेकडो हात कामापासून वंचित राहणार हे सत्य कटू असले तरी स्वीकारावेच लागणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: