अमरावती – श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित स्थानीक तक्षशिला महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल याना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजनकुमार सहाय्य यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, महामहिम दादासाहेब गवई याना पुष्पार्पण करून अभिवादन केले.
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी केली जाते. या अभिवादन कार्यक्रमात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकतेची शपथ देण्यात आली. प्राचार्य डॉ. अंजनकुमार सहाय्य यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल हे भारत छोडो आंदोलनात आघाडीवर होते.
वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. ते शूरवीरापेक्षा कमी नव्हते.
२०० वर्षांच्या गुलामगिरीत अडकलेल्या देशातील विविध राज्यांना त्यांनी एकत्र करून भारतात विलीन केले आणि या मोठ्या कार्यासाठी त्यांना लष्करी बळाचीही गरज भासली नाही. ही त्याची सर्वात मोठी कीर्ती होती, जी त्यांना सर्वांपासून वेगळे करते.
यावेळी प्राचार्य डॉ. अंजनकुमार सहाय्य, डॉ. प्रणाली पेटे, उमेश अरगुडवार, किशोर केचे, अतुल बोडखे, राहुल तरोडकर, सुरज नाईक यांच्यासह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी वल्लभभाई पटेल याना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.