राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
राज्यभरातून हजारो कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिर्डी : तांत्रिक कामगार युनियन 5059 चे पहिले द्विवार्षिक महा अधिवेशन रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी थाटात पार पडले. राहाता येथील सिद्ध संकल्प सभागृहात पार पडलेल्या या ऐतिहासिक महाअधिवेशनाला राज्यभरातून हजारो वीज कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अतिशय शिस्तबद्ध व थाटात पार पडलेल्या या महाअधिवेशनाचे ध्वजारोहण अहमदनगरच्या माजी जि प अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. तर महाअधिवेशनाचे उदघाटक म्हणून माजी ऊर्जामंत्री आ. प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते पार पडले. तर सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे हे होते.
तर अकोले मतदार संघांचे विद्यमान आमदार डॉ. किरणजी लहामटे साहेब, नॅशनलिस्ट ट्रेंड युनियन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे साहेब,शिर्डीचे माजी नगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर, महापारेषणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील, संभाजी ब्रिगेड प्रदेश महासचिव सुभाष बोरकर,महावितरण नाशिकचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी चे अध्यक्ष रमेशभाऊ गोंदकर, तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकरजी लहाने, केंद्रीय उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ, केंद्रीय उपसरचिटणीस नितीन चव्हाण , शिवाजी शिवनेचारी, केंद्रीय संघटक महेश हिवराळे ,राज्यसचिव आनंद जगताप, रघुनाथ तात्या लाड, प्रकाश निकम मुख्य कार्यालय प्रतिनिधी विक्रम चव्हाण, संजय पाडेकर, केंद्रीय कोषाध्यक्ष गजानन अघम पाटील,
कार्यकारी संपादक सुनील सोनवणे, उपसंपादक विवेक बोरकर,तांत्रिक कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष किरण कराळे व संस्थापक सरचिटणीस प्रकाश वाघ,तांत्रिक अप्रेंटशिप कंत्राटी कामगार असोसिएशनचे कार्याध्यक्ष विकी कावळे, शेख राहील आदी मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम संघटनेचा ध्वजारोहण सोहळा थाटात पार पडला यावेळी शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उपस्थित मान्यवरांनी मानवंदना दिली. तदनंतर प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून या महाधिवेशनाचे उद्घाटन माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते थाटात पार पडले. सतीष भुजबळ यांनी आपल्या प्रास्ताविक मधून अधिवेशन आयोजनाचा आढावा विषद करून संघटनेच्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी तिन्ही कंपन्यांचे होणारे खाजगीकरण, वाढीव इंधन भत्ता, स्वतंत्र वेतनश्रेणी, तांत्रिक कामगारांच्या कामाचे तास व कामाचे स्वरुप ठरविण्यात यावे, सहाय्यक यांचा कालावधी उच्च वेतनश्रेणीकरिता ग्राह्य धान्य यावे, 01/04/2019 नंतरचे कार्यरत झालेले उपकेंद्र मध्ये कायम यंत्रचालकांचे पदे मंजूर करण्यात यावे तसेच यंत्रचालकांची निर्माण झालेले वेतन तफावत दूर करण्यात यावी, कंत्राटी कामगारांचे प्रलंबित असलेले प्रश्न, तिन्ही कंपनीतील तांत्रिक कामगार उच्चशिक्षित डिप्लोमा डिग्री धारकांकरिता अंतर्गत अधिसूचने द्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात यावी,
कामगार विरोधी कामगार कायदे, महावितरणच्या वर्ग 4 च्या कामगारांना वर्ग 3 मध्ये वर्ग अपग्रेड करण्यात यावे, आधुनिक सुरक्षा साधने, T&P पुरविणे, ग्राहक संख्येनुसार कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी तसेच कामगार संख्येमध्ये वाढ करण्यात यावी , कंपनीतील रिक्त पदाचा अनुशेष त्वरित भरण्यात यावा, जलविद्युत केंद्राचे खाजगीकरण करण्यात येऊ नये,
औष्णिक केंद्रामध्ये मनुष्यबळ पुरविण्यात यावे, GO ७४ मधील तफावत दूर करण्यात यावी, महापारेषण वर्क नॉर्म्स यासह वीज कामगारांचे विविध महत्वाच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी वेळप्रसंगी आक्रमक भूमिका घेण्याचा पवित्रा संघटना घेत राहील आणि वीज कामगारांसाठी संघटना अविरत शासन प्रशासना समवेत संघर्ष करणार असा विश्वास त्यांनी उपस्थित सभासदांना दिला.
या अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून खासदार,माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित राहणार होते.त्यादृष्टीने त्यांच्या कार्यालयाकडून कार्यक्रम ही जाहीर करण्यात आला होता, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाच्या अधिकार्यांनी कार्यक्रम स्थळी भेटही दिली होती तसेच जिल्हा प्रशासनाकडून हेलिपॅड करिता परवानगीही दिली होती परंतु अचानक त्यांना दिल्लीला रवाना व्हावे लागले त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु त्यांनी अधिवेशनाकरिता उपस्थित राहता येत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली व कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे महसूल मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार होते परंतु त्यांनाही महत्वाच्या बैठकीस उपस्थित होण्याकरिता जावे लागले परंतु अधिवेशन स्थळी त्यांच्या सुविद्य पत्नी, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील उपस्थित राहिल्या व ध्वजारोहण केले.
तांत्रिक कामगार संघटनेच्या पाठीशी विखे पाटील परिवार भक्कमपणे उभा : सौ. शालिनीताई विखे पाटील घराघरात प्रकाश देणारा लाईनमन स्टाफ यांचे अनेक प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी तांत्रिक कामगार युनियन आहे,
या अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेली वीज कामगारांची हजारोची संख्या संघटनेवर कामगारांचा असलेला विश्वास व्यक्त करते. अशा प्रामाणिक काम करणाऱ्या तांत्रिक कामगार युनियन यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी विखे पाटील परिवार सदैव तत्पर राहील असे आश्वासन शालिनीताई विखे पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिले.
वीज कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन अपयशी : प्राजक्त तनपुरे
लाईन स्टॉप हा महावितरण चा महत्त्वाचा घटक आहे. एक तर वसुली करण्याच्या कार्यपद्धतीमुळे हा लाईनस्टाप पूर्णतः खचलेला आहे. वसुलीसाठी गेलेल्या स्टाफ वर प्राणघातक हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही गंभीर बाब आहे. याला अंकुश घालण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. वीज कामगारांचे छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी ही सरकार अपयशी पडत असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. मी सत्तेत आल्यानंतर वीज कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहील आणि संघटनेला सुद्धा सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
तांत्रिक कामगारांच्या न्यायासाठी एकत्रितपणे लढा : आ.डॉ. किरण लहामटे
अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसांच्या तीन मूलभूत गरजा आहेत त्यापैकीच आता वीज ही महत्त्वाची गरज झाली आहे सण उत्सव असो की दवाखान्याची गरज असते यामध्ये वीज ही अविभाज्य घटक झाली आहे आणि ही विजेची अखंडितपणे सेवा देणारे कर्मचारी मात्र अनेक प्रलंबित प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतात त्यांच्यावर येणारी ही वेळ चिंता व्यक्त करणारी आहे.
तांत्रिक कामगार युनियन सारख्या प्रामाणिक काम करणाऱ्या संघटना कर्मचाऱ्यांना निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास आहे परंतु हा लढा अधिक तीव्र करायचा असेल तर एकत्रितपणे लढण्याची गरज आहे असे प्रतिपादन आमदार किरण लहामटे यांनी यावेळी केले.
यावेळी नॅशनलिस्ट ट्रेंड युनियन फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे साहेब यांनी दोन वर्षांच्या अल्पकालावधीत संघटनेने केलेल्या कामाचे,पत्रव्यवहाराचे मनापासून कौतुक केले व संघटनेची कार्यपध्दती व वाटचाल पाहता संघटना लवकरच पंधरा हजार सभासद संख्येचा आकडा गाठेल असा विश्वास व्यक्त केला.
महापारेषणचे मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भरत पाटील साहेब यांनीही संघटनेचे पहिलेच अधिवेशन भव्यदिव्य साजरे होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.संघटना प्रशासनाकडे जे प्रश्न मांडते ते प्रश्न सोडविण्यासाठी आमचे सहकार्य नेहमीच मिळेल याची ग्वाही दिली.
एप्रिल २०२३ पासून लागू होत असलेली वेतनवाढ लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासनही प्रयत्नशील असून सर्व संघटना प्रतिनिधी व प्रशासन यांची पुढील बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल असे सांगितले.तसेच कर्मचाऱ्यांना लागू असलेला सध्याचा विस लाखांचा अपघाती मृत्यू विमा पन्नास लाख रुपये करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
प्रकाशन सोहळा
अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात तांत्रिक डायरी २०२४ तसेच अधिवेशन निमित्ताने तयार करण्यात आलेली ‘साईश्रध्दा ‘ स्मरणिका, सुरक्षा पुस्तिका, ‘तांत्रिक उत्सव’ विशेषांक तसेच तांत्रिक दिनदर्शिका यांचे प्रकाशन व संघटनेच्या स्फुर्तीगीताचे गीतार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संघटनेची वाटचाल विशद केली. नवी दिशा नवा विचार घेऊन कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटना बांधील असल्याचे यावेळी ते म्हणाले. अवघ्या दोन वर्षात संघटनेने 5000 पेक्षा जास्त सभासद संख्येचा टप्पा पार केला आहे यावरून संघटनेच्या पारदर्शी नेतृत्वावर वीज कामगारांचा वाढलेला विश्वास अधोरेखित होत आहे, हा विश्वास टिकून ठेवण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून व्यक्त केले. संचालन गायत्री मस्के, मते सर व शंकर जारकड यांनी तर आभार राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड यांनी मानले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थानी जेष्ठ कामगार नेते बी बी.पाटील हे होते. या दुसऱ्या सत्रात महापारेषण महानिर्मिती महा वितरण या तिन्ही कंपनीतील प्रलंबित असलेल्या वीज कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
तिन्ही कंपनीतील प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा ठराव यावेळी घेण्यात आला. या सत्रामध्ये दिलीप कोरडे, प्रभाकर लहाने, शिवाजी शिवनेचारी, रघुनाथ लाड, आनंद जगताप, गोपाल गाडगे, बी आर पवार, गजानन अघम, प्रकाश निकम यांनी विचार व्यक्त केले. या सत्राचे संचालन शिवाजी शिवनेचारी यांनी तर आभार बी आर पवार यांनी मानले.
शेकडो वीज कामगारांनी केले रक्तदान
तांत्रिक कामगार युनियन 5059 च्या या द्विवार्षिक महा अधिवेशन स्थळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन विकास आडे महावितरण नाशिक चे जनसंपर्क अधिकारी विकास आडे यांनी केले.या रक्तदान शिबिरास अनेक वीज कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी पहिले रक्तदान राज्यसचिव आनंद जगताप व प्रकाश निकम यांनी केले.
सेल्फी पॉईंट बनला आकर्षण
तांत्रिक कामगार युनियन 5059 च्या द्विवार्षिक महा अधिवेशन च्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेला सेल्फी पॉइंट हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. यावेळी अधिवेशनासाठी आलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. यावेळी आलेल्या काही मान्यवरांना सुद्धा सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.
अंध कलावंतांच्या सुमधुर स्वरांनी केले मंत्रमुग
वाशिम येथील चेतन सेवांकुर संस्थेच्या अंध असलेल्या कलावंतांनी सुमधुर गायनांने राज्यभरातून आलेल्या वीज कर्मचाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी या चेतन सेवांकुर संस्थेला संघटनेच्या वतीने 25 हजाराचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला.
राष्ट्रसंतांच्या खंजिरीने केले प्रबोधन
तांत्रिक कामगार युनियन नागपूर प्रादेशिक पदाधिकारी तथा राष्ट्रीय प्रबोधनकार मोहनदास चोरे गुरुजी यांनी आपल्या खास शैलीत प्रबोधन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराचा जागर यावेळी सप्तखंजेरी च्या माध्यमातून त्यांनी केला.
अधिवेशनाच्या वेळी जळगाव येथील प्रदीप पाटील व बीड येथून राजशेखर शिखरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सभासदांनी संघटनेच्या नेतृत्वावर व कार्यपध्दती वर विश्वास ठेवून संघटनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रवेश करणार्या सभासदांचे केंद्रीय पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.तसेच सेवानिवृत्त पदाधिकारी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार ही करण्यात आला. अधिवेशनाकरिता महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून हजारो च्या संख्येने तांत्रिक कामगार उपस्थित होते यामध्ये महिला सभासदांची संख्याही लक्षणीय होती.
या महाअधिवेशनाच्या यशस्वीते साठी अहमदनगर नगर जिल्ह्यातील तांत्रिक कामगार युनियन 5059 च्या सर्व स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.