पातूर – निशांत गवई
अकोला शेतीच्या कामानिमित्त सहा वर्षांआधी घेतलेले तीन लाख रुपये देण्यास टाळाटाळ करीत असलेल्या ग्रामसेवक योगेश तोताराम कापकर याला पाच लाख रुपयांचा दंड व सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा पाचवे अतिरिक्त न्यायदंडाधिकारी श्रीमती अ. आ. देसाई मॅडम यांनी शुक्रवारी ता. ४ ऑक्टोबर रोजी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सण २०१८ मध्ये ग्रामसेवक योगेश तोताराम कापकर यांनी फिर्यादी कमलकिशोर कांतीलाल जैन यांच्याकडून शेतीच्या कामासाठी तीन लाख रुपये हातउसने म्हणून घेतले होते. हा सर्व व्यवहार फिर्यादी जैन यांनी मे ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत पूर्ण केला होता.
ही रक्कम काही महिन्यात परत करण्याचे वचन कापकर यांनी जैन यांना दिले होते. परंतु कापकर यांनी रक्कम परत न दिल्याने फिर्यादी जैन यांनी त्यांना तगादा लावला, परिणामी कापकर यांनी फिर्यादी जैन यांना १ जुन २०१९ रोजीचा धनादेश दिला. फिर्यादी जैन यांनी सदर धनादेश ११ जुन २०१९ अकोला जनता बँकेतील आपल्या खात्यात वटविण्यासाठी लावला असता सदर धनादेश ‘ अपुरा निधी ‘ या शेऱ्यासह परत आला.
परिणामी फिर्यादी जैन यांनी कापकर यांना आपल्या वकिलामार्फत मागणी नोटीस पाठवली असता नोटीसचा नमूद कालावधीत उत्तर न आल्याने न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत या प्रकरणी योगेश कापकर यांना दोषी ठरवत फिर्यादी कमलकिशोर जैन यांना पाच लाख रुपये परत देण्याचे आदेश दिले,
सोबतच सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली सोबतच आदेशापासून एक महिन्याच्या आत दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. याप्रकरणी फिर्यादी जैन यांच्यावतीने ऍड.डी. एम. काळे यांनी कामकाज पाहिले. तर याप्रकरणी कापकर यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.