सांगली – ज्योती मोरे
मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्याप्रमाणे महाराष्ट्रात ही सरकारने कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करावे या मागणीसाठी गेल्या 35 दिवसांपासून राज्यातील चारही कृषी विद्यापीठात सुरू असलेले कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
त्यामुळे आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मधील विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व त्यांची तीव्रता सरकारच्या लक्षात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रपतींनाही आपल्या रक्ताने पत्रे लिहून कृषी अभियांत्रिकी संचालनालयाची मागणी केली आहे.
दरम्यान सरकारसह, विरोधी पक्ष व इतर सर्व आमदारांनी सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भात लवकरात लवकर प्रश्न उपस्थित करावा. अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.तसेच इतर राज्यात (मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब, राजस्थान, ओडिस, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश, मिझोराम, मेघालय) मृद व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी शाखा व स्थापत्य अभियांत्रिकी शाखा समतुल्य आहेत.
तर महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र कृषि अभियांत्रिकी पदवी असतानाही मृदा व जलसंधारण विभागात कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यां पात्र का नाही? कृषि अभियंत्यांना संधी का दिली जात नाही? कृषि अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना पात्र करून भरती प्रक्रिया राबविण्यात यावी ही मागणी सरकारकडे कृषि अभियंते करत आहेत.