Monday, December 23, 2024
Homeकृषीआकोट बाजार समितीमध्ये शासकीय प्रशासक रुजू…अशासकीय प्रशासकांनी गुंडाळला गाशा…

आकोट बाजार समितीमध्ये शासकीय प्रशासक रुजू…अशासकीय प्रशासकांनी गुंडाळला गाशा…

आकोट- संजय आठवले

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आकोट बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकांचे चंबु गबाळे आवरले गेल्यानंतर आकोट बाजार समितीचे शासकीय प्रशासक म्हणून सहाय्यक उपनिबंधक खाडे यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांचा कारभार बाजार समितीच्या निवडणुका पूर्ण होईपर्यंत राहणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतर आलेल्या सुट्टीच्या दिवशीही बुलढाणा जिल्ह्यातील अशासकीय सदस्य असलेल्या बाजार समित्यांमध्ये शासकीय प्रशासकांना नियुक्त करण्याची कारवाई करण्यात आली.

त्यामुळे आकोट बाजार समितीमध्ये शासकीय प्रशासक म्हणून कोण येणार याबाबत सर्वांनाच कमालीची उत्सुकता लागून होती. परंतु अशासकीय प्रशासकांचा भोंगळ कारभार आणि त्याने उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आकोट बाजार समितीचा कारभार घेण्यास कुणीच तयार होत नव्हते. परंतु अखेरीस सहाय्यक उपनिबंधक खाडे यांचे गळ्यात आकोटची वरमाला घातली गेली. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे खाडेंनी आकोट बाजार समितीचा कारभार जवळून अनुभवलेला आहे. शिवाय ते आकोट येथील सहाय्यक उपनिबंधकाचा कार्यभारही सांभाळीत आहेत. त्यामुळे येथील कार्यभार त्यांच्याकडे दिला गेला आहे.

या कार्यभारामुळे जिल्ह्यातील तीन तालुक्यातील तब्बल अर्धा डझन कार्यालयांचे कारभार त्यांच्याकडे आले आहेत. त्यांची मूळ नियुक्ती अकोला येथे सहायक उपनिबंधक म्हणून झालेली आहे. आता त्यांच्याकडे आकोट येथील अर्बन बँकेचा अवसायक, आकोट येथीलच सहाय्यक उपनिबंधक आणि आता बाजार समितीचे प्रशासक अशा तीन कार्यालयांची जबाबदारी दिली गेली आहे. यासोबतच त्यांच्याकडे तेल्हारा सहायक उपनिबंधक व आता तेल्हारा बाजार समिती प्रशासक या दोन पदांचीही जबाबदारी आहे. हे सर्व मिळून त्यांच्याकडे तब्बल अर्धा डझन कार्यालयांचा कार्यभार दिला गेला आहे.

अशा स्थितीत हे सहा कार्यभार ते कशाप्रकारे सांभाळतील हा मोठा प्रश्न आहे. त्यातच कोणत्याही समस्येतून मार्ग काढण्याऐवजी त्या समस्येतून सुटका करवून घेण्याचाच त्यांचा स्वभाव आहे. त्याचे प्रत्यंतर माजी मुख्य प्रशासक व व्यापारी यांचे उद्भवलेल्या वादा दरम्यान आले. प्रशासक, व्यापारी, शेतकरी आणि शेतकरी पॅनलचे नेते यांची संयुक्त बैठक स्वतःच आयोजित केल्यावरही त्यांनी या बैठकीला दांडी मारली होती. त्यातच आपल्या अहंकारी स्वभावाने मूख्य प्रशासकही या बैठकीपासून लांबच राहिले. परिणामी सारे ओझे बाजार समितीचे सचिव सुधाकरराव दाळू यांचे माथी मारले गेले. त्या ताणामुळे बिचाऱ्या दाळू साहेबांचा रक्तचाप वाढल्याने त्यांना चार-पाच दिवस रजेवर जावे लागले होते.

अशाप्रकारे समस्येतून पळ काढण्याच्या खाडेंच्या स्वभावामुळेच आताही ते आकोट बाजार समितीचा कार्यभार स्वीकारण्यास नाखुश होते. परंतु अंदर की बात ही आहे की, आकोटातील काही व्यापाऱ्यांनी धीर देऊन त्यांना आकोटची जोखीम उचलण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांनी येथील कार्यभार स्वीकारला आहे. म्हणूनच बाजार समितीची निवडणूक पार पडेपर्यंत ते कोणतीही समस्या उद्भवू देणार नाहीत असे तूर्तास तरी वाटते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: