नरखेड – अतुल दंडारे
महाराष्ट्राच्या सिमेलगत असलेल्या पांढुर्णा येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गोटमार केल्या जाते ही गोटमार देशभरात प्रसिध्द आहे. या अंधश्रध्दा आणि अघोरी प्रथेत दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात. तर काहींना अपंगत्व येते.
गेल्या तिनशे वर्षापासून सुरु असलेल्या या गोटमारीत आजपर्यंत १३ लोकांचा बळी गेला असून पोलीस प्रशासन सुद्धा सावरगांव व पांढुर्णा या गावांच्या अंधश्रध्दा व अघोरी प्रथेमुळे हतबल असल्याचे दरवर्षी दिसुन येते. यावर्षी आज सकाळ पासुन सायंकाळपर्यंत जाम नदीवर गोटमार पाहायला मिळाली.
यामध्ये ५१४ जखमी तर ३ गंभीर जखमी झाले. मात्र सतत वाढत्या पावसामुळे दोन्ही कडील मंडळी झेंडा तोडण्यात अपयशी ठरले. या गोटमार मध्ये स्थानिक आमदार निलेश उइके यांनी सुद्धा गोटे मारून परंपरा निभावल्याचे आज दिसुन आले.
मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील ही गोटमार एका प्रेमी युगुलाच्या प्रेम कथेवरुन तिनशे वर्षापूर्वी एकमेकांचा काटा काढण्याकरीता दगडफेक करुन सुरु करण्यात आली होती. तेव्हापासून एखाद्या धार्मिक विधीप्रमाणे ही गोटमार सतत सुरु आहेे.
बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता हि गोरमार जिल्हाधिकारी मनोज पुष्प, जिल्हापोलीस अधिक्षक विनायक वर्मा, उपविभागीय महसुल अधिकारी आर.आर. पांडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश पंड्रो यांचे प्रमुख उपस्थीतीत सुरुवात करण्यात आली मात्र सकाळ पासुनच सुरु असलेल्या पावसामुळे जाम नदीचे पाणी वाढतच गेल्याने दोन्ही गटाचे नागरीक झेंडा तोडण्यात अपयशी ठरले.
या गोटमारीत यावर्षीसुद्धा ५१४ नागरीक जखमी झालेत, दरम्यान काहींना अपंगत्व आले तर ३ अति गंभीर जखमींना नागपुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये पांढुर्णा च्या खारीवार्ड मधील रामचंद्र खुरसंगे, शास्त्रीवार्ड मधील सागर शंकर कुमरे तर झिल्पा येथील संजय शानु वाडोदे यांचा समावेश आहे.
आजपर्यंत १३ लोकांना या गोटमारीमध्ये स्वत:चे प्राण गमवावे लागले. वरुड शहरापासून ३५ किमी अंतरावर मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे जाम नदीच्या एका तिरावर सावरगाव ग्रामपंचायत आहे. तिनशे वर्षापुर्वी पांढुर्णा व सावरगांव या गावातील मुला – मुलीचे सुत जुळले व दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडुन गेले.
त्याकाळी प्रेम करणे म्हणजे वाईट समजल्या जायचे. यामुळेच या प्रेमी युगलाला घर व समाज दोन्ही कडून प्रखर विरोध झाला. परिणामी दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. दोघेही दोन्ही गावाला जोडणाऱ्या जाम नदीजवळ पोहोचले. तोपर्यंत ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली.
आणी दोन्ही गावातील नागरिक नदी तिरावर पोहचले व त्या प्रेमी युगलांचा विरोध करीत त्यांनी गोटमार सुरु केली. प्रेमी युगल एकीकडे राहीले आणि गोटमार दोन्ही गावातील नागरिकांमध्ये सुरु झाली. प्रेमी युगलातील एकाला जीव गमवावा लागला. ही घटना जणूकाही देव वानीनुसार सुरु झाली असे समजून त्यामागील कारणमिमांसा न शोधता तेव्हाची दगडफेक गोटमारच्या स्वरुपात आज सुध्दा सुरुच आहे.
दोन्ही गावातील नागरिकांमध्ये सलोखा असला तरी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र दगडफेक करायला ते विसरत नाही. या दगडफेकीत यावर्षी सुद्धा शेकडो नागरीक जखमी झाले. या गोटमार दरम्यान पोलिसांची चांगलीच दमछक झाली. ही गोटमार पाहण्यासाठी मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील नागरीकांनी सुद्धा मोठ्यासंख्येने पांढुर्णा येथे गर्दी केल्याचे चित्र यावर्षी सुद्धा पहावयास मिळाले.