आकोट- संजय आठवले
संजय गांधी निराधार अनुदान योजना तथा श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला द्यावा लागत असे. हा दाखला काढणे संदर्भात कोणतेच ज्ञान नसल्याने या लाभार्थ्यांची सेतू केंद्रांमार्फत मोठी लूट केल्या जात असे. परिणामी या लाभार्थ्यांना शारीरिक, मानसिक व आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने राज्य शासनाने या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे. आता उत्पन्नाचा दाखला दरवर्षी न देता तो पाच वर्षातून एकदाच द्यावा असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
राज्यात जवळपास ४१ लक्षाचेवर या योजनेचे लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून १८ ते ६४ वयोगटातील निराधार व्यक्ती, दिव्यांग, अनाथ मुले, घटस्फोटित स्त्रिया, दुर्लक्षित स्त्रिया, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच तृतीयपंथीयांना शासनाकडून आर्थिक साहाय्य पुरविले जाते. याशिवाय, श्रावणबाळ योजनेअंतर्गत राज्यातील ६५ व त्यापेक्षा अधिक वयाच्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या स्त्रियांना व पुरुषांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आर्थिक साहाय्य पुरविले जाते.
हे सहाय्य प्राप्त करण्याकरिता शासनाच्या नियम व अटींचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यानुसार दरवर्षी एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयात सादर करणे हा त्यातीलच एक नियम. परंतु या लाभार्थ्यांसाठी हा नियम अतिशय जाचक ठरला होता. हा उत्पन्नाचा दाखला काढण्याकरिता या लाभार्थ्यांना जवळपास १५० ते २५० रुपयांचा खर्च करावा लागत असे. उतार वयात लटपटत्या पायांनी तहसीलच्या अनेक वार वाऱ्याही कराव्या लागत असत. हा दाखला कुठून काढावा आणि कुठे द्यावा या संदर्भात काहीही ज्ञान नसल्याने या लाभार्थ्यांची अतिशय परवड होत होती.
राज्य शासनाने या सर्व बाबींची दखल घेतली असून दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. आता हा दाखला दरवर्षी न देता पाच वर्षातून एकदाच द्यावा लागणार आहे. या निर्णयाने संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या जाचक अटींच्या या शिथिलतेची माहिती अद्यापही या लाभार्थ्यांना झालेली नाही. त्याने आताही या लाभार्थ्यांची सेतू केंद्रांमार्फत लूट करणे सुरूच आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना या नियमाची माहिती झाली आहे त्यांनी आपल्या परिचयातील या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना ही माहिती पुरवून त्यांची लूट थांबविण्यास मदत करावी असे आवाहन महाव्हाईस ने केले आहे.