नागपूरमध्ये होणार सहा मॅचेस
चंद्रशेखर बर्वे
मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठंही गेला तरी; मातृभूमि त्याच्या हृदयात केवळ जीवंत राहत नाही तर आपल्याला या समाजाचं ऋण फेडायचं आहे, हा विचार त्याच्या मनात सतत घोंगावत असतो. आणि मातृभूमिच्या चरणी सेवा अर्पन करण्याची एकही संधी सोडत नाही. याचं जीवंत उदाहरण द्यायचं झालं तर डॉ. अभय पापलीकर यांचं नाव घ्यावं लागेल.
पापलीकर उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल धर्माधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अभय पापलीकर हे अमेरिकेतील पापलीकर उद्योग समूहाचे प्रमुख. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी अमरावती हे त्यांचं मूळ ठिकाण. यामुळे विदर्भाशी त्यांचं भावनिक नातं जुळलेलं आहे.
विदर्भ देशातील एक आर्थिक केंद्र म्हणून विकसीत व्हावं अशी डॉ. पापलीकर यांची इच्छा आहे. आणि म्हणूनच पुढील वर्षी 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंसोबतच स्थानिक खेळाडूंना सोबत घेवून आयपीएलची टीम बनविण्याची योजना आखली आहे.
पापलीकर समूह गेल्या पाच वर्षांपासून आयपीएल मॅचेसमध्ये गुंतवणूक करीत आहे. या काळात अनेक टीममध्ये गुंतवणूक केली आहे. परंतु, पुढच्या वर्षी पहिल्यांदा स्वतःची टीम बनवून आयपीएलच्या मैदानात उतरणार आहे. आतापर्यंत जागतिक दर्जाच्या खेळाडूंवर गुंतवणूक केली होती. आता विदर्भातील उत्तम दर्जाच्या खेळाडूंना टीममध्ये संधी दिली जाणार आहे. एवढंच नव्हे तर, विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील मैदानावर तब्बल सहा मॅचेस खेळण्याची योजना आहे. याचा फायदा स्थानिक इकॉनॉमीला बळ मिळेल, असे डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले.
महत्वाचा मुद्या असा की, विदर्भात उत्तम दर्जाचे खेळाडू आहेत. उत्कृष्ठ मैदान आहे. देशातील सर्वोत्तम मैदानामध्ये नागपूरच्या जामठा ग्राउंडचा उल्लेख होतो. 45 हजार आसन क्षमता आहे. आणि इतरत्र सापडणार नाहीत असे क्रिकेटवेडे वैदर्भिय आहेत. शुक्रवार दि. 23 सप्टेबर रोजी झालेल्या भारत विरूध्द ऑस्टेªलिया सामन्याचे 45 हजार तिकीटं अवघ्या 15 मिनिटात विकली गेली. पाचशे रूपयाचं तिकीट तीन हजारात विकले गेले. एवढे क्रिकेट शौकीन या भागात आहे. मध्यप्रदेशची सीमा लागून असल्यामुळे तेथूनही क्रिकेटप्रेमी येथे मॅच बघायला येतात.
यानंतरही, नागपूरच्या मैदानावर आतापर्यंत आयपीएलची एकही मॅच झाली नाही. अशात, पापलीकर समूहाने नागपुरच्या मैदानात सहा मॅचेस खेळण्याची योजना आखल्यामुळे विदर्भातील क्रिकेटप्रेमींनाच नव्हे तर स्थानिक खेळाडू आणि इकॉनॉमीला याचा मोठा फायदा होणार आहे.
विदर्भाची टीम जागतिक दर्जाच्या मॅचेस खेळण्यास सक्षम आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. 2017-18 आणि 2018-19 या दोन वर्षी विदर्भाच्या टीमने सलग रणजी ट्रॉफी आणि इराणी ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. मागच्या वर्षी 2022 मध्ये विदर्भातील पाच खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु, पापलीकर ग्रुपने आयपीएलमध्ये स्वतःची टीम बनवून नागपुरात सहा मॅचेस खेळण्याची योजना आखल्यामुळे विदर्भातील खेळाडूंचे नशिब फडफडल्याशिवाय राहणार नाही, असेच म्हणावे लागेल.