बंगळुरूमधील एका मंदिरात एक विचित्र घटना घडली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेला मंदिरातून ओढत बाहेर नेले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये महिलेला लाथ मारून थप्पड मारण्यात येत असल्याचे दिसत आहे. वास्तविक, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला आणि पुजारी यांच्यात वाद होताना दिसत आहे. महिला मंदिरात जाण्याचा आग्रह धरते आणि पुजारी तिला बाहेर काढण्यासाठी तिला मारहाण करीत आहे. महिलेने विरोध केल्यानंतर पुजाऱ्याने तिला जबरदस्तीने मंदिरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी पुजाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला
व्हिडिओनुसार, पुजाऱ्याने महिलेचे केस पकडून तिला मंदिराबाहेर ओढले. व्हिडिओमध्ये आणखी तीन लोक दिसले. मात्र, यापैकी कोणीही पुजाऱ्याला रोखण्याचा किंवा महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. विशेष म्हणजे मंदिरात महिलेवर हल्ला झाल्याची घटना २१ डिसेंबरची आहे. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, हेमावती या पीडित महिलेने अमृतहल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अमृतहल्ली परिसरातील लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिरातील धर्मदर्शी मुनीकृष्ण यांनी तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीत ती बाई म्हणाली…भगवान वेंकटेश्वर माझे पती आहेत असं महिलेचं म्हणणं आहे. त्यामुळे ती महिला मंदीरात देवाच्या शेजारी बसण्याचा हट्ट करीत होती. ज्यावेळी तिला मंदीराच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आलं त्यावेळी पुजाऱ्याच्या तोंडावर थुंकली. त्यानंतर त्या महिलेला पुजारी आणि तिथल्या तीन व्यक्तीनी मारहाण करीत बाहेर काढले. पोलिसांनी पुजाऱ्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. मंदिराचे धर्मगुरू मुनिकृष्ण यांनी महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी मुनीकृष्णाविरुद्ध भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.