Sunday, December 22, 2024
Homeराज्यसंस्कृत शैक्षणिक संस्थांचे जागतिक नेटवर्क गरजेचे - राज्यपाल रमेश बैसः संस्कृत विश्वविद्यालयाचा...

संस्कृत शैक्षणिक संस्थांचे जागतिक नेटवर्क गरजेचे – राज्यपाल रमेश बैसः संस्कृत विश्वविद्यालयाचा दीक्षांत समारंभ…

रामटेक – राजु कापसे

संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. भारताचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे संस्कृतशिवाय शक्य नाही. जगात योग आणि आयुर्वेदाप्रमाणेच संस्कृत भाषेबद्दलही आकर्षण निर्माण झाले आहे.

त्यामुळे २०४७ पर्यंत देववाणी संस्कृत ही देशातील पहिली पसंतीची भाषा व्हावी आणि आणि जगातील विद्यार्थी या भाषेकडे आकर्षित व्हावेत, यासाठी संस्कृत शैक्षणिक संस्थांचे जागतिक नेटवर्क तयार करावे, असे उद्‌गार राज्यपाल रमेश बैस यांनी काढले आहे.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा द्वादश दीक्षांत समारंभ बुधवारी (ता.६) संपन्न झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती रमेश बैस दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यपाल पुढे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यापीठांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देते.

यासाठी मी कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विदेशातील उत्तमोत्तम विद्यापीठांशी सामंजस्य करार करून शैक्षणिक आदान-प्रदान करण्याचे आवाहन करतो. विकसित भारताचे लक्ष्य विचारात घेवून, कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने पहिल्या १० विद्यापीठांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यपाल आभासी माध्यमातून उपस्थित होते.

कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांच्या यजमानत्वाखाली संपन्न झालेल्या या समारोहात विशिष्ट अतिथी या नात्याने प्रो. प्रल्हाद जोशी, कुलगुरू, कुमार भास्कर वर्मा संस्कृत व पुरातनाध्ययन विश्वविद्यालय, नालबारी, आसाम उपस्थित होते.

कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, परीक्षा नियंत्रक डॉ. जयवंत चौधरी, व्यवस्थापन परिषद, विद्वत् परिषदेचे सदस्य, सर्व अधिष्ठाता आणि पदकदान दाते याप्रसंगी विशेषत्वाने उपस्थित होते.दीक्षांत समारोहाचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रो. प्रसाद गोखले यांनी राज्यपालांचे स्वागत केले.कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी स्वागतपर भाषणात विश्वविद्यालयाचा विकास व प्रगतीविषयक अहवाल सादर केला.

विश्वविद्यालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पूर्णपणे अंगिकार केला असून, भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित अभ्यासक्रमांचे परिचालनही केले आहे. विश्वविद्यालयांचे लक्ष्य आता वारंगा येथे आंतरराष्ट्रीय केंद्र लवकरात लवकर परिचालित व्हावे हेच असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल तथा विश्वविद्यालयाचे कुलपती रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना दीक्षांतोपदेश प्रदान केला. दीक्षांत समाहोत २५१५ पदव्युत्तर पदवी, ५३५६ पदवी, १९९२ पदविका, २३६ पदव्युत्तर पदविका व २२६ प्रमाणपत्रासह मुक्त स्वाध्यायपीठम् द्वारा २०७ पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र अशी एकूण १०५८३ प्रमाणपत्रे प्रदान केली.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: