आकोट – संजय आठवले
मराठा आरक्षणाबाबत अख्ख्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघत असताना आंदोलनकर्ता मनोज जरांगे यांनी मराठ्यांना कुणबी ठरवून त्यांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केल्याने आकोट येथील सर्वपक्षीय नेत्यांनी शासनाने ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
स्वर्गीय भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांचे अथक प्रयत्नांनी विदर्भातील तत्कालीन मराठ्यांनी शासकीय कागदपत्रात कुणबी म्हणून नोंद घेतलेली आहे. त्यामुळे विदर्भात जवळपास सर्वच मराठा, कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट झालेले आहेत. त्यासह ओबीसी प्रवर्गात एकूण २६१ जातींचा समावेश झालेला आहे. अशा स्थितीत खुल्या प्रवर्गातील प्रचंड संख्येच्या मराठा जातीचा समावेश कुणबी म्हणून ओबीसी मध्ये झाल्यास ओबीसी प्रवर्गावर मोठा बोजा येणार आहे.
दुसरीकडे समाजात अतिशय लहानसा टक्का असलेल्या जाती समूहाचे शासकीय नोकऱ्यांमध्ये अवास्तव आधिक्य आहे. अशा स्थितीत प्रचंड संख्येचा मराठा समाज खुल्या प्रवर्गातून ओबीसींमध्ये वर्ग झाल्यास खुल्या प्रवर्गात प्रचंड जागा रिक्त होणार आहेत. आणि ह्या रिक्त जागख आपोआपच त्या अल्पसंख्येच्या जाती समूहांना बहाल होणार आहेत. त्यामुळे “ज्याचा जितका टक्का त्याचा तितका वाटा” हे धोरणच नष्ट होणार आहे. तेणेकरून शासकीय नोकऱ्यांमध्ये मोठा असमतोल निर्माण होणार आहे.
हि बाब लक्षात घेऊन आकोट येथील सर्व पक्षीय नेत्यांनी ओबीसी आरक्षणाला बाधा न पोचविता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, असा पवित्रा घेतला आहे. त्याकरिता आकोटचे माजी आमदार संजय गावंडे यांचे नेतृत्वात सर्वपक्षीय लोकांनी आकोट शहरातील श्री शिवाजी महाराज चौक येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले आहे. उपोषण संपल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर संजय गावंडे, प्रशांत पाचडे, डॉक्टर प्रमोद चोरे, प्रदीप वानखडे, डॉक्टर गजानन महाले, एडवोकेट मनोज खंडारे, उमेश देशमुख, विठ्ठलराव गावंडे, दिलीप बोचे, जयदेव साबळे, सतीश हाडोळे शाम गावंडे मंगेश चिखले, योगेश नाठे, डॉक्टर अरविंद लांडे, मुकुंदराव गावंडे, वाल्मीक भगत, अरुण जवंजाळ, अर्जुन तेलगोटे, ज्ञानदेवराव परनाटे, वासुदेव भास्कर, मयूर आसरकर, विष्णू बोडखे, अनिल गावंडे, सतीश धुळे, कार्तिक गावंडे, कमल वर्मा, कु. चंचल पितांबरवाले, सौ. माया म्हैसने, संग्रामसिंह ठाकुर, अवि ठाकुर, संजय आठवले, आदी मान्यवरांच्या स्वाक्षऱ्या आहेत