आकोट – संजय आठवले
अकोला जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची अक्षरशः लूट सुरू असून सोयाबीन उत्पादकांवर मोठा अन्याय होत असल्याने ४ हजार ६०० रुपये ह्या सोयाबीनच्या आधारभूत किमतीप्रमाणे शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करण्याची मागणी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे.
एकीकडे शासन सोयाबीन करिता आधारभूत किंमत चार हजार सहाशे रुपये असल्याचे सांगते. प्रत्यक्षात मात्र ३,५०० ते ४,३०० रुपयातच सोयाबीन खरेदी केली जात आहे. आधीच अस्मानी संकटांनी अडचणीत आलेला शेतकरी या सुलतानी संकटाने कोलमडण्याचे स्थितीत आला आहे.
आधारभूत किमतीपेक्षा कमी किंमत आकारून शेतकऱ्यांना मागविले जात आहे. स्वतःला शेतकरी हितैषी सरकार म्हणून घेणारे मात्र याबाबतीत कानावर हात ठेवून मौन बसले आहेत. त्यामुळे आता त्यांनी शेतकऱ्यांचा आक्रोश ध्यानी घेऊन सोयाबीनला आधारभूत किंमतीत खरेदी करावे. अशी मागणी अकोला जिल्हा काँग्रेसने केली आहे.
जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्फत हे निवेदन मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे पाठविण्यात आले आहे. या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समितीमध्ये त्वरित आधारभूत किमतीत सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करावीत.
भावांतर योजना कार्यान्वित करून व्यापाऱ्यांना विकलेले सोयाबीन व शासकीय आधारभूत किंमत यातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांना ताबडतोब देण्यात यावी. बाजार समितीमधील आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने होणारी खरेदी त्वरित बंद करावी. शासनाने आदेशित केलेली २५% अग्रीम विम्याची रक्कम शेतकऱ्यांचे खात्यात ताबडतोब जमा करावी.
अशा मागण्यांच्या या निवेदनावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रदीप वखारिया, चंद्रकांत सावजी, कपिल राव देव, एडवोकेट सुरेश ढाकुलकर, विजय देशमुख, ऍडव्होकेट महेश गणगणे, तुळशीदास बोदडे, प्राध्यापक दिनकर पाटील, प्रमोद पागृत या मान्यवरांच्या स्वाक्षर्या आहेत.