Sunday, November 17, 2024
Homeराज्यआकोट येथे जल्लोषात परंतु शांततेत गणेश विसर्जन...ईद शोभायात्राही निघाली त्याच धर्तीवर…आकोटकरांचा दोन्ही...

आकोट येथे जल्लोषात परंतु शांततेत गणेश विसर्जन…ईद शोभायात्राही निघाली त्याच धर्तीवर…आकोटकरांचा दोन्ही उत्सवात सहभाग…

आकोट – संजय आठवले

सालाबादप्रमाणे यंदाही आकोट शहरात जल्लोषात परंतु शांततेत गणेश विसर्जन पार पडले असून ईद शोभायात्राही त्याच धरतीवर पार पडली. गणेश विसर्जन व ईद हे दोन्ही उत्सव एकत्र आल्याने या उत्सवांप्रति हिंदू मुस्लिम समाजाचा आपसी समझौता यंदाचे अविस्मरणीय वैशिष्ट्य ठरला आहे. त्यामुळे आकोटकर अभिनंदनास पात्र असल्याचे बोलले जात आहे.

यंदा गणेशोत्सव आणि ईद मिलादुन्नबी हे दोन्ही सण एकाच वेळेस आले. त्यामुळे प्रशासन काहीसे तणावाखाली होते. परंतु हे दोन्ही उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याची हमी शांतता समिती सदस्य. गणेश मंडळे व ईद शोभायात्रा आयोजकांनी घेतली. तरीही सतर्क प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. परिणामी दोन्ही धर्मीय उत्सव निर्विघ्नपणे पार पडले.

महत्त्वाचे म्हणजे दोन्ही धर्मीय लोक दोन्ही उत्सवांमध्ये सारख्याच उल्हासाने आणि सहभागी झालेले दिसून आले. दुसरी बाब म्हणजे पालिका व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुक उमेदवारांनी दोन्ही कडील मंडळांना चंदा रूपाने भरीव मदत केल्याचे दिसून आले.

यावर्षी एकूण ६२ मंडळांनी गणेश स्थापना केली होती. त्यातील ४१ मंडळे मुख्य शोभायात्रेत सामील झालीत तर २१ मंडळांनी स्थापना स्थळावरून थेट विसर्जन स्थळी जाणे पसंत केले. शोभा यात्रेतील वाद्ये रात्री दहा वाजता बंद करण्याचे बंधन सर्वच मंडळांनी तंतोतंत पाळले. गणेशाच्या विविध अविर्भावातील अवाढव्य मुर्त्या या शोभा यात्रेतील विशेष आकर्षण ठरल्या. त्यामुळे गणेश मंडळांनी मूर्ती व वाद्ये यावरच बराच खर्च केल्याचे दिसून आले.

शोभा यात्रेदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, ठाणेदार तपन कोल्हे, यांचे मार्गदर्शनात शहरातील व बाहेरून आलेले एकूण ४३ पोलीस अधिकारी, ४०२ पोलीस कर्मचारी व १३९ होमगार्ड यांनी तगडा बंदोबस्त ठेवला. महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी बळवंतराव अरखराव, तहसीलदार डॉक्टर विजय चव्हाण आणि त्यांचे पथक, नगरपालिका मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंबरे आणि त्यांचे पथक. विद्युत विभागाचे अधिकारी मनोहर देशपांडे आणि त्यांचे पथक यांनीही आपले कर्तव्य चोखपणे पार पाडले.

गणेश शोभायात्रेनंतरच्या दुसऱ्या दिवशी मोहम्मद पैगंबर यांचे जन्मदिनानिमित्य आकोट येथील अहले सुन्नत वल जमात मरकजचे इमाम व खतीब हाफिज व फाजील मुक्ती मौलाना आमीर रजा यांचे नेतृत्वाखाली भव्य जुलूस काढण्यात आला. शहरातील शौकत अली चौक येथून सरळ मार्गाने बस स्थानकापर्यंत जाऊन त्याच मार्गाने हा जुलूस शौकत अली चौक येथेच विसर्जित करण्यात आला. या निमित्याने जुलूस मार्गात हिंदू व मुस्लिम बांधवांनी ठिकठिकाणी फराळ व पेयजलाचे स्टॉल लावले होते.

जुलूस मार्गात विविध संघटनांच्या वतीने जुलूसचे स्वागत करण्यात आले. सुन्नी मरकज अहले सुन्नत जमातच्या वतीने आयोजित हा जुलूस यशस्वी करण्याकरिता तौहिद खान, गफूर शाह, सय्यद मझहर अली, अब्दुल रहीम हाजी जावेद सिद्दिकी, मोहम्मद हुसैन, सय्यद अजहर यांचे सह असंख्य मुस्लिम बांधवांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर, ठाणेदार तपन कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अख्तर शेख, राजेश जवरे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: