गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले
गांधीनगरसह परिसरातील वाढत्या चोऱ्या रोखा व तावडे हॉटेल उड्डाणपूल ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंत अन् उचगाव उड्डाणपुलाखालील नित्य होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करा, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा करवीर शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) शिष्टमंडळाने करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांना देण्यात आला.
गांधीनगर परिसरात १४० वर चोऱ्या करून चोरट्यांनी पोलीसांना आव्हान दिले. मणेरमळा येथील मंदिरातील चोरीचे फुटेज मिळुनही चोर सापडले नाहीत. तपास न झाल्याने चोरट्यांनी पुन्हा पुन्हा चोऱ्या करून पोलिसांनाच आव्हान दिले आहे. घराला कुलुप लावून बाहेर पडणे कठीण झाले आहे. याबाबत त्वरित उपाययोजना व्हावी.
तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंतच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याची आहे. उचगांव उड्डाण पुलाखाली वाहतुकीच्या कोंडीने नागरीक त्रस्त आहेत. याठिकाणी पोलीस असूनही वाहतुकीची कोंडी होते. वाहतुकीस शिस्त न लावता पोलीस ग्राहकांच्या वाहनाना लक्ष्य करत दंडात्मक कारवाईवर जोर देतात. चिंचवाड रस्त्यावर ट्रान्सपोर्ट परिसरात तर वाहनतळ झाल्याचे दिसून येते.
रस्त्यावर काही ठिकाणी पट्टे न मारल्याने व मारलेले पट्टे अल्पावधीतच पुसुन गेल्याने परगावाहून येणाऱ्या ग्राहकांचे वाहन पोलिसांकडून लक्ष्य केले जाते. दंडात्मक कारवाईमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. संबंधित घटकांची बैठक घेऊन उपाययोजना करावी अन्यथा शिवसेना जन आंदोलन करेल, असा इशाराही तालुकाप्रमुख राजू यादव, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट यांनी दिला.
सहाय्यक फौजदार महादेव बुगडे यांनी निवेदन स्वीकारले. दिपक रेडेकर, दिपक पोपटाणी, योगेश लोहार, जितू कुबडे, दिपक अंकल, सुनील पारपाणी यांनी चर्चेत सहभाग घेतला. अजित चव्हाण, बाबुराब पाटील, जितू चावला आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.