नयनदीप्य क्षण कैद करण्यासाठी भाविक, पर्यटकासह, हौसींची गर्दी…
रामटेक – राजु कापसे
विदर्भातील रामटेक हे हिंदू धर्मियांचे पवित्र धार्मिक स्थळ मानले जाते. नागपूर शहरापासून ५० किलोमीटर असणाऱ्या रामटेक स्थानाचे पौराणिक, अध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. श्रीराम वनवासात असताना येथे वास्तव्यास होते. त्यामुळे रामटेक नाव पडल्याचा लोकमानस आहे. येथे यादवकालीन श्रीरामाचे मंदिर असून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक याठिकाणी येत असतात.
तसेच निसर्गाच्या सान्निध्यात उंच टेकडीवर वसलेल्या मंदिरासह या परिघात अनेक पर्यटस्थळेही आहेत. त्यामुळे दररोज येथे राज्यासह अन्य राज्यातून असंख्य भाविक आणि पर्यटक याठिकाणी येथ असतात. पुरातन काळातील मंदिरांचे रेखीव बांधकाम असल्यामुळे मनमोहक आणि ऐतिहासिक काळात नेणाऱ्या या परिसराला आता रामटेक विधानसभेचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांनी अनोखी, आधुनिक आणि वैविध्यपूर्ण आकर्षक विद्युत रोषणाई करून सौदर्यात आणखी भर घातली आहे. त्यामुळे मंदिर परिसर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पात आमदार आशिष जयस्वाल यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने २११ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ज्यातून शहरात विविध विकास कामे केले जाणार आहे. तर रामटेकचे वैभव असलेल्या गड मंदिरासाठी पुरेश्या निधीची तरदूत करण्यात आल्याची घोषणा राज्य सरकार कडून करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून ५ कोटी रुपयाच्या निधीची तरदूत करून देत, यामधून गड मंदिर परिसरात भव्यदिव्य व आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
नुकतेच आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांचा माध्यामतून या कामाला सुरुवात करण्यात आली. गड मंदिर परिसरातील मुख्य मंदिर कळस, राम मंदिर, लक्ष्मण मंदिर, हनुमान मंदिर, दशरथ मंदिर, तुळशी मंदिर, मुख्य प्रवेशद्वार, राम नहानी, सीता नहानी, सितामाता रसोई, अगस्ती मुनी आश्रम,राम झरोका, मनोरे, सर्व स्मारके आणि तटरक्षक भिंतीला ही विद्युत रोषणाई लावण्यात आली. दररोज नवनवीन प्रकारात ह्या विद्युत रोषणाईचे प्रदर्शन असल्याने भाविक – भक्तांसह रामटेकवासियांचे मन मोहून टाकल्या जात आहे. या क्षणाचा आनंद आणि तो क्षण अविस्मरणीय करण्यासाठी रात्रीच्या वेळी शेकडो भाविकांची मांदियाळी मंदिर परिसरात पहावयास मिळत आहे.
मंदिराच्या आतील बाजूसदेखील आकर्षक रोषणाई केली आहे. मंदिरातील गाभारा आणि आजूबाजूचा परिसर या आकर्षक रोषणाईने झगमगू लागला आहे. पायरीजवळ अतिशय आकर्षक पद्धतीने एल.ई.डी. दिव्यांच्या माळा वापरुन रोषणाई करण्यात आली आहे. मंदिराची शिखरे आणि मंदिरावर विविध रंगांच्या दिव्यांचे फोकस मारण्यात आल्याने गड मंदिराचे रुपडेच पालटले आहे. आमदार ॲड.आशिष जयस्वाल यांच्या माध्यामतून रामटेक विधानसभा, शहर आणि गड मंदिर परिसराचा होत असलेला विकास पाहता जनतेकडून त्यांच्या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.