न्युज डेस्क – राजकारणात स्पष्ट बोलणारा नेता म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संपूर्ण देशात त्याचं नाव आहे. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी प्रदीर्घ काळ काम करणारे नितीन गडकरी यांना ‘भारताचा महामार्ग पुरुष’ म्हणूनही ओळखले जाते. देशाच्या विकासासाठी नेहमीच पुढे असणा-या नितीन गडकरी यांच्या जीवनावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याची रिलीज डेट जाहीर झाली आहे.
नुकतेच गडकरी या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार आणि अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित हा चित्रपट अक्षय अनंत देशमुखचा आहे. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची भूमिका कोण साकारणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गडकरी’ चित्रपटाच्या ट्रेलर आणि टीझरची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.
या चित्रपटाबाबत दिग्दर्शक अनुराग भुसारी सांगतात, ‘नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकीर्द खूप चांगली आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, मोठ्या विचारसरणीचा नेता, रस्ते सुधारणांचा प्रचारक. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रत्येक पैलू लोकांना माहीत आहे.
समाजहिताची तळमळ असलेल्या या नेत्याचा राजकीय प्रवास अनेकांना माहीत असला तरी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि तरुण वयही तितकेच रंजक आहे. अशा या नेत्याचे जीवन या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चित्रपट २७ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.
गेल्या काही वर्षांत अनेक नेत्यांचे जीवनपट प्रेक्षकांसमोर आले आहेत. ‘ठाकरे’, ‘द एक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’, ‘थलायवी, पीएम’, ‘नरेंद्र मोदी’ यांसारखे बायोपिक लोकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. आता लोक गडकरींच्या बायोपिकची आतुरतेने वाट पाहत आहेत.