Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीगडचिरोली | ०८ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण...

गडचिरोली | ०८ लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण…

२८ जुलै नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलाची यशस्वी कामगिरी…

गडचिरोली – मिलिंद खोंड

गडचिरोली २८ जुलै ते ०३ ऑगस्ट दरम्यान नक्षलवादी हे नक्षल शहिद सप्ताह पाळतात. या सप्ताहामध्ये नक्षलवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलांवर हल्ले करणे, खबरी असल्याच्या संशयावरुन निष्पापांच्या हत्या करणे, रस्ते बंद करणे, बंद पुकारणे, धमकावणे, जनतेकडुन पैसा वसूल करणे, ठेकेदाराकडुन खंडणी गोळा करणे इ. हिंसक कारवाया करत असतात.

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्याचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.

नुकतेच एकुण ०८ लाख रुपये बक्षीस असलेले नक्षलवादी अडमा जोगा मडावी, (वय २६) रा. जिलोरगडा, पो. पामेड तह. ऊसुर, जि. बिजापूर (छ.ग.) व टुगे कारु वड्डे, वय ३५ वर्ष रा. कवंडे, पो. बेद्रे, तह. बैरामगड, जि. बिजापूर (छ.ग.) या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या समोर आत्मसमर्पण केले.

अडमा मडावी हा जुलै २०१४ ला पामेड एलजीएसमध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०२१ पर्यंत कार्यरत होता. माहे जानेवारी २०२१ ला झोन ऍक्शन टीममध्ये बदली होवून कार्यरत राहून माहे जुन २०२३ ला दलमसोडुन घरी परत आला. त्याचा चकमक – ८, खुन – ५, जाळपोळ – १ व इतर – २ इ. गुन्ह्यात सहभाग.

सन २०१६ मध्ये मौजा बोटेतोंग जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. तसेच सन २०१७ मध्ये मौजा बुरकापाल जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफचे २५ जवान शहीद झाले होते. तसेच मौजा चिन्ना बोडकेल जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. यावेळी पोलीस पार्टीचे २ जवान शहीद व ०५ जवान जखमी झाले होते.

तसेच सन २०१८ मध्ये मौजा मुरडोंडा रोडवर झालेल्या भुसुरुंग स्फोट (एमपीव्ही) मध्ये त्याचा सहभाग असून त्यात पोलीस पार्टीचे २ जवान शहीद व ५ जवान जखमी झाले होते. यासोबतच सन २०१८ मध्ये मौजा झारापल्ली जं.प. चकमकीमध्ये त्याचा सहभाग असून यामध्ये पोलीस पार्टीचे ३ जवान शहीद ७ जवान जखमी व मौजा कोंडास्वाल रोडवर चकमक/हमल्यामध्ये पोलीस पार्टीचे १ जवान शहीद झाले होते.

तसेच सन २०२० मध्ये मौजा एर्शन जंगल परिसरातील चकमकीमध्ये त्याचा सहभाग असून यामध्ये पोलीस पार्टीचे २ जवान शहीद व ७ जवान जखमी झाले होते तसेच मौजा मिनपा चकमक/हमल्यामध्ये त्याचा सहभाग असून त्यात पोलीस पार्टीचे १७ जवान शहीद व २० पोलीस जवान जखमी झाले होते.

सन २०१८ मधील मौजा झारा (कुतुल एरिया) येथील ०१ इसम सन २०२० मधील गुमगुडेम येथील १ इसम, गोंडभटुम येथील १ इसम व कोमाट येथील १ इसम तसेच सन २०२३ मधील मोजा झारा (नेलनार) येथील १ इसम अशा एकुण ०५ निरपराध इसमांच्या खुनात तो प्रत्यक्षरित्या सहभागी होता.

सन २०२२ मध्ये मौजा झोरी येथील रोड कामावरील २ (१ ट्रक व १ टेम्पो) वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता. सन २०१५ मध्ये पामेड पासून तेलंगणाकडे जाणाऱ्या रोडवर तसेच सन २०२३ मध्ये मौजा ओरच्छा ते धनोरा (छ.ग.) रोडवर खोदकाम करण्यात त्याचा सहभाग होता.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे

दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता / जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वतःसाठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही. वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात. दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही.

पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे. खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वतःच्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.

टूगे वड्डे हा सन २०१२ ला जाटपूर दलम जनमिलीशीय सदस्य पदावर भरती होऊन सन २०२३ पर्यंत कार्यरत राहुन घरी परत आला होता. सन २०२० मधील मौजा नंगुर व मौजा कवंडे येथील ०२ इसम सन २०२१ मधील मौजा झारामरका येथील १ इसम, मौजा परकेली येथील १ इसम व मौजा कवंडे येथील १ इसम तसेच सन २०२२ मधील मौजा नंगूर येथील १ इसम अशा एकुण ०६ निरपराध इसमांच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता. सन २०२२ मध्ये मौजा ईरपनार (म.रा.) येथील रोड कामावरील १२ (ट्रॅक्टर, जेसीबी) वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे

शासनाने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळत नाही वरिष्ठ कॅडरचे माओवादी सर्व जमा केलेला पैसा स्वतःच्या उन्नतीसाठी वापरतात व कनिष्ठ माओवाद्यांना गरजेपुरताही पैसा दिला जात नाही. छत्तीसगड, महाराष्ट्र मधील नक्षलवाद्यांना वरच्या पदापर्यंत जाण्याची संधी मिळत नाही. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावीत झाल्यामुळे.

महाराष्ट्र शासनाने अडमा जोगा मडावी याचेवर ६ लाख रूपयाचे बक्षीस टूगे कारु वड्डे याचेवर २ लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन अडमा जोगा मडावी यास एकुण ४ लाख ५० हजार रुपये व दुगे कारु वड्डे याला एकुण ४ लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे.

माओवादी जसे सांगत आले की, आमचा लढा हा जनतेसाठी आहे, तो कधी जनतेसाठी नव्हताच. सप्ताहाच्या नावाखाली गरीब आदिवासींची पिळवणूक करणे, ठेकेदारांकडुन खंडणी गोळा करणे, वर्चस्व गाजवणे, देशविघातक कृत्य करणे यासाठीच फक्त त्यांचा लढा आहे.

त्यामुळे गडचिरोली पोलीस दल सर्व जनतेला आवाहन करते की, माओवाद्यांच्या खोट्या व फसव्या तथाकथीत क्रांतीला बळी पडू नये. गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२ ते २०२३ सालामध्ये आतापर्यंत एकुण १२ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्प असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख् प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दव सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: