पोलीस-नक्षल चकमक ; तीन नक्षलवादी ठार
गडचिरोली, १३ मे :
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे. यात पेरमिली एलओएस कमांडर तथा विभागिय समिती सदस्य बस्तर निवासी वासु याचे सह दोन महिला नक्षलींचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील कतरनगट्टा येथील जंगल परिसरात १३ मे रोजी सकाळी ही चकमक उडाली.
प्राप्त माहितीनुसार, पेरमिली दलमचे नक्षलीकतरनगट्टा येथील जंगल परिसरात आपला कॅम्प लाऊन पोलीसांना टार्गेट करण्याच्या दृष्टीने बसले होते. ही माहिती प्राप्त होताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० या नक्षलविरोधी पथकाचे जवान शोध अभियानावर निघाले, अभियानादरम्यान पोलीसांच्या पथकाची चाहूल लागताच कॅम्प मधील नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार सुरु केला. पोलिसांनी प्रत्यूत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन महिलांसह एक पुरुष असे एकूण तीन नक्षलवादी मृत्यूमुखी पडले असल्याचे आढळून आले. घनदाट जंगलाचा फायदा घेऊन इतर नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.
यानंतर पोलिसांनी केलेल्या शोध अभियानादरम्यान तीन मृतदेहांसह एक एके ४७, एक कार्बाईन आणि एक इनसास रायफल यांसह नक्षल साहित्य सापडले आहे. मृतक तीन नक्षल्यांपैकी एकाची ओळख पटली असून तो पेरमिली दलम कमांडर तसेच विभागिय समिती सदस्य बस्तर निवासी वासु असल्याचे म्हटले आहे. दरम्यान परिसरात शोध मोहीम राबविण्यात येत आहे.