महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते एकुण 02 लाख रुपयांचे बक्षीस.
गडचिरोली – मिलिंद खोंड
खून, चकमकी आणि जाळपोळीच्या गुन्ह्यांत सहभागी असलेल्या छत्तीसगड राज्यातील महेंद्र वेलादी (वय ३२) या नक्षल्यास गडचिरोली पोलिसांनी आज (दि.६) अहेरी तालुक्यातील दामरंचा गावानजीक अटक केली आहे.
महेंद्र वेलादी हा छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील चेरपल्ली येथील रहिवासी आहे. तो २००९ मध्ये नक्षल दलममध्ये सहभागी झाला. सुरुवातीला पुरवठा समिती आणि सध्या नॅशनल पार्क एरियामधील सँड्रा दलममध्ये कार्यरत होता. सध्या नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु असून, या सप्ताहात ते हिंसक कारवाया करतात.
आज महेंद्र वेलादी हा दामरंचाजवळच्या इंद्रावती नदी परिसरात पोलिसांच्या हालचालींची माहिती देण्याच्या हेतूने फिरत असताना विशेष अभियान पथक आणि केंद्रीय राखीव दलाच्या ९ क्रमांकाच्या बटालियनच्या जवानांनी त्यास अटक केली. दामरंचा आणि मन्नेराजाराम या दोन्ही ठिकाणच्या पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या हालचालींवर तो पाळत ठेवून होता, असे पोलिसांनी सांगितले.
२०२३ मध्ये कापेवंचा-नैनेर जंगलात वनाधिकाऱ्यांवर हल्ला आणि जाळपोळीच्या घटनेत त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०२२ मध्ये टेकामेट्टा येथे झालेल्या चकमकीसह सँड्रा येथे २०२३ मध्ये झालेल्या एका नागरिकाच्या हत्येतही तो सहभागी होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७२ नक्षल्यांना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान), यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.