गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात धक्कादायक प्रकरण समोर आलंय येथे एकाच कुटुंबातील पाच जणांचा विष देऊन हत्या करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपी महिलांना अटक केली आहे. संघमित्रा कुंभारे आणि रोजा रामटेके अशी आरोपी महिलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विष देऊन एका महिन्यात पीडित कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून व इतर वादातून कुटुंबीयांनी विष देऊन संपवलं असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
काय प्रकरण आहे
गडचिरोलीचे एसपी नीलोत्पल यांनी सांगितले की, ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव गावात घडली. येथे गेल्या काही दिवसांपासून शंकर पिरू कुंभारे आणि त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांची अचानक तब्येत बिघडली आणि पाचही जणांचा अवघ्या 20 दिवसांत मृत्यू झाला. यापूर्वी 20 सप्टेंबर 2023 रोजी शंकर कुंभारे आणि त्यांची पत्नी विजया कुंभारे आजारी पडल्याने त्यांना अहेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले. जिथे 26 सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे यांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 सप्टेंबर रोजी विजया कुंभारे यांचा मृत्यू झाला.
यानंतर शंकर यांची मुलगी कोमल दहागावकर, शंकर यांचा मुलगा रोशन कुंभारे आणि रोशनची मुलगी आनंदा हेही आजारी पडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातही त्यांची प्रकृती ढासळली आणि कोमलचा ८ ऑक्टोबरला, आनंदाचा १४ ऑक्टोबरला आणि रोशन कुंभारेचा १५ ऑक्टोबरला मृत्यू झाला. पोलिसांचे म्हणणे आहे की या पाच सदस्यांव्यतिरिक्त आरोपी महिलांनी आणखी दोन जणांनाही विष पाजले होते मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
कुटुंबातील दोन महिला आरोपी निघाल्या
कुटुंबातील पाच जणांचा आकस्मिक मृत्यू झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास केला असता शंकर कुंभारे यांची सून संघमित्रा कुंभारे आणि शंकर यांच्या मेव्हणीची पत्नी रोजा रामटेके यांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलांना ताब्यात घेतले. पोलिसांचे म्हणणे आहे की, कडक चौकशी केल्यानंतर आरोपी महिलांनी आपला गुन्हा कबूल केला असून विष प्राशन केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.