नरखेड – अतुल दंढारे
प्रत्येक पालकांच्या अपेक्षा असते की, आपला पाल्य हुशार असावा त्याचा वर्गात पहिला क्रमांक यावा, त्याचे सर्वत्र कौतुक व्हावे मात्र त्या मुलाच्या क्षमतेच्या, बुद्धिमत्तेचा व त्याने आत्मसात केलेल्या कौशल्याचा पालक विचार करतात का?
व्यक्तिमत्त्व विकासाचे ‘शिक्षण’ हे माध्यम आहे.जगात तंत्रज्ञान व अन्य घडामोडीमुळे जग झपाट्याने बदलत आहे.या जीवघेण्या स्पर्धत विद्यार्थी टिकायला पाहिजे, म्हणून पालक चिंतेत असतो.मात्र शिक्षणातून खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जबाबदार,संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक तयार होणे अपेक्षित आहे.
अध्यापनातून विद्यार्थ्यांची क्षमता व कौशल्य विकसित व्हावी.तसेच स्वयंअध्ययन करण्याची प्रेरणा व जागरुकता अभ्यासक्रमातून निर्माण व्हावी.आतापर्यंत शिक्षकाच्या विविध प्रशिक्षणातून शिकवायचे कसे ? यावर भर देण्यात आला.मात्र विद्यार्थी शिकेल कसा ? यावर दुर्लक्ष करण्यात आले.भविष्यात उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन न्याय्य व ज्ञानवंत समाज तयार करण्याची जबाबदारी ‘नवीन शैक्षणिक धोरण’ कडून अपेक्षित आहे.
लोकल टू ग्लोबल विचार शिक्षणात रुजायला हवा,भविष्यकरिता सर्वांगीण व्यक्तिमत्त्व असलेला विद्यार्थी, अद्यावत ज्ञानसंपन्न बालक व 100% क्षमतेचे उपयोजन कौशल्य शिक्षणातून विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवे.याकरिता अभ्यासक्रमात चिकित्सक विचार, सर्जनशील विचार, सहयोगी शिक्षण, संवाद कौशल्य, आत्मविश्वास,करुणा इत्यादी घटकांचा विचार अभ्यासक्रम निर्मितीच्या वेळेस व्हावा.