अकोला – अमोल साबळे
कु. श्रेया रामेश्वरराव ( बाळूभाऊ ) मोरखडे. निंबा या गावची रहिवासी. शेतकरी कुटुंबात जन्म. वडील बाळूभाऊ, जोडधंदा म्हणून फोटोग्राफीचा व्यवसाय करतात. यशस्वी व्यवसायिकाचे सारे गुण या माणसात कुटून भरले आहेत. भयंकर विनयशील स्वभाव! जोडीला ग्रामीण भागाचा आणि तिथल्या समाजजीवनाचा व राजकारणाचा उल्लेखनीय अभ्यास.
मग याच आव्यात हे मडके तावून सुलाखून निघाले. आणि आज टणटण वाजायला लागले. श्रेया ने स्वकर्तृवाने, गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली अटकेपार झेंडा फडकविला! नीट च्या परीक्षेत तिने प्रचंड यश मिळवीत 720 पैकी 645 मार्क्स मिळविले. या गुणी लेकीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. निंबा येथील मोरखडे कुटुंबाच्या शिरपेचात असा मानाचा तुरा खोवल्याने, समस्त मोरखडे कुटुंबाचे अभिनंदन करताना कमालीचा आनंद व अभिमान वाटत आहे.
‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी!’ या उक्तीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात श्रेया च्या आईने काहीच कसर ठेवली नाही. प्रत्येक कुटुंबातील गृहिणीने असा आत्मविश्वासाने कमरेला पदर खोचला की कुटुंबाची भरभराट व्हायला उशीर लागत नाही. याचा हा उत्तम नमुना आहे.
मिळविलेले यश हे कोण्या एकट्याचे कधीच नसते ते नेहमी सांघिक असते. म्हणून त्याचा आवाका ही निश्चितच नजरेत भरणारा असतो. श्रेया ची मेहनत, गुरूजनांचे मार्गदर्शन आणि तिच्या या संपूर्ण शैक्षणिक प्रवासात तिचे पालक ज्या जिद्दीने तिच्या पाठिशी उभे ठाकले हे सारे कौतुकास्पद आहे.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालक जेव्हा खऱ्या अर्थाने सांघिक व प्रामाणिक प्रयत्न करतात त्याचे दृष्य परिणाम असे ठळकपणे नजरेत भरल्याशिवाय राहत नाही. श्रेया, चा मेडिकलच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवस भराभर निघून जातात.
उद्या हीच, श्रेया अंगात पांढरा कोट ( अॅप्रन ) घालून रूग्णसेवा करतांना दिसली तर फार आश्चर्य वाटून घेऊ नका. तिच्या इथवरच्या शैक्षणिक प्रवासाला मानाचा मुजरा! आता आमचे बाळूभाऊ, बोलायला मोकळे झालेत, ‘माझी लेक माझा अभिमान!’ बाळूभाऊंनी, या निवडीचे श्रेय, तिच्या गुरूजनांना व सहकाऱ्यांना दिले.
खरेतर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. लेकीचे कौतुक करताना त्यांचा भरून आला होता. हे वेगळे सांगायची गरज नाही. श्रेया च्या करिअरच्या अनुषंगाने त्यांची अन् माझी काही महिन्यांपूर्वी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे त्यांना लख्ख आठवत होते. मुलांच्या भविष्याची काळजी करणारे पालक असले की, श्रेया सारखा अनमोल हिरा जन्माला घातला जातो.
संपूर्ण समाजाचे ते वैभव असते. आणि वैभव म्हटले की ते अभिमानाने मिरवणे आलेच! कळतनकळत समाजातून फार मोठी रसद मिळत असते याची जाणीव, बाळूभाऊंना आहे. व हेच त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. श्रेया च्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा! बढे चलो… ! बढे चलो,…!