पातूर – निशांत गवई
चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत पिंपळखूटा येथे रेतीचे उत्खनन व अवैध वाहतूक बाबत वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून पत्रकार राहुल देशमुख यांच्यावर लोखंडी रॉड व दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना २६ मे रोजी घडली होती. तेव्हापासून पाचही आरोपी मोकाट असल्याने चान्नी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होती.अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंग , अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, बाळापुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळ राज यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय चव्हाण,उप निरीक्षक संजय कोहळे,
दिनेश झटाले,उमेश सांगळे,सुरेश चव्हाण यांनी सापळा रचून ३० मे रोजी मध्यरात्री आरोपी रवींद्र अनिरुद्ध महानकार, कैलास परसराम वाहोकार, समीर अरविंद देशमुख, शुभम नागोराव देशमुख,या चार हल्लेखोर व आरोपींना सहकार्य करणारा रोहित भगवान दांदळे असे पाची आरोपींना चिखली येथून एका हॉटेलातून अटक केली आहे. परसराम गणपत वाहोकार हा हल्लेखोर फरार आहे. पुढील तपास ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उप निरीक्षक संजय कोहळे करीत आहे.
गुन्ह्यात वापरलेली कार जप्त व गुन्ह्यात वाढ…
पाचही हल्लेखोरांविरुद्ध भादवीच्या ३२६ कलमान्वये गुन्ह्यात वाढ केली असून,आरोपींना सहकार्य करणारा आरोपी चालक रोहित भगवान दांदळे यांच्या विरुद्ध भादविच्या २१२ कलमान्वये गुन्हा दाखल करून गुन्ह्यात वापरलेली आरोपीची कार सुद्धा जप्त करण्यात आली,
फरार असलेल्या पाचही आरोपींचा पाच दिवसापासून रात्रंदिवस शोध सुरू होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तांत्रिक मदतीच्या साह्याने ३० मे रोजीच्या मध्यरात्री चार आरोपी व चालक असे पाच आरोपींना चिखली येथून अटक केली, गुन्ह्यात वाढ केली असून, गुन्ह्यात वापरलेले कार सुद्धा जप्त केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
विजय चव्हाण ठाणेदार पो. स्टे चान्नी