सांगली – ज्योती मोरे.
रायगड जिल्हा परिषद, पं. स. पोलादपूर नरवीर व तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट, उमरठ व ग्रामस्थ मंडळ उमरठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे ३५३ वा शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने यंदाचा “सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे शौर्य सेवा पुरस्कार २०२३” हा पुरस्कार श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांना प्रतापगड येथील शिवप्रताप भूमीचा २१ वर्षांचा लढा यशस्वी करुन शिवप्रताप भूमी मुक्त केल्याबद्दल नरवीर तानाजी मालुसरे यांचे १३ वे वंशज डॉ. शीतल मालुसरे व त्यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांची पुण्यतिथी त्यांच्या उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड या गावी “शौर्य दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट उमरठ व ग्रामस्थ मंडळ उमरठ यांच्यावतीने सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे ३५३ वा शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत कळंबे यांनी केले.
यावेळी बोलताना श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान व सय्यद बंडा यांच्या थडग्याजवळ झालेला गडजिहाद श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलन व शिंदे फडणवीस सरकारने विधानमंडळातील व रस्त्यावरची लढाई करून गडजिहाद उध्वस्त केला. त्याप्रमाणे विशाळगडासह राज्यातील 48 किल्ल्यांवर झालेला गड जिहाद उध्वस्त केल्याशिवाय शिवभक्तांनो आता थांबायचं नाही.
राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारने नरवीर तानाजी मालुसरेंच्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत त्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन परंतु राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे सरकार असताना राजकीय नेत्यांच्या स्मारकासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले होते, त्याप्रमाणे तानाजी मालुसरे यांच्या समाधीसाठी 50 कोटी रुपये मिळावे अशी मागणी केली.
सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्या दि. १५ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी निमित्त उमरठ या गावी माजी आमदार नितीन शिंदे व भाजपा महिला मोर्चा, सांगली जिल्हाध्यक्षा, नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी उपस्थित राहून समाधी स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी अनिल मालुसरे, प्रकाश कदम, नितीनजी देशमाने, बाळासाहेब मोहिते-पाटील, गजानन मोरे, श्रीधर मेस्त्री, चेतन भोसले, आकाश काळेल यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.