मौदा :- खरीप आणि रब्बी हंगामातील अवकाळी पावसामुळे झालेल्या गहू आणि धानाच्या पिकाच्या नुकसानीचे योग्य पद्धतीने पंचनामे न केल्यामुळे तालुक्यातील हजारों शेतकरी प्रशासनाच्या हलगर्जी कारभारामुळे नुकसान भरपाई मदतीपासून वंचीत राहिल्यामुळे मागील तीन दिवसापासून काँग्रेस पक्षाकडून उपोषनाला सुरुवात करण्यात आली होती. सदर आमरण उपोषण जिल्हा परीषद सदस्य योगेश देशमुख, पंचायत समिती सभापती सभापती स्वप्नील श्रावणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रोशन मेश्राम आणि पंचायत समिती सदस्य दीपक गेडाम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे होते. उपोषण सुरू करताच वादळ, वारा व पावसाने दिवस आणि रात्रभर हजेरी लावली. तरीही संकटाला न घाबरता उपोषण तीन दिवस सुरुच राहिले.
आज उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी राज्याचे माजी मंत्री सुनील केदार, रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि उपविभागीय अधिकारी सचीन गोसावी यांनी उपोषण स्थळी भेट देवून उपोषण कर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर विषयावर १४ सप्टेंबर ला सकाळी ११:०० वाजता उपविभागीय अधिकारी मौदा यांचे दालनात खासदार बर्वे आणि जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांचे उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली आहे.
सदर बैठकीत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करु तथा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कायद्याच्या चौकटित बसून न्याय मिळवून देवु असे आश्वासन उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांनी उपोषण कर्त्यांना दिले. उपोषण स्थळी शेकडो शेतकऱ्यांनी उपस्थीती नोंदविली होती.
उपोषणकर्ते रोशन मेश्राम यांनी मागील सहा महिन्याच्या तहसीलदार धनंजय देशमुख यांच्या कार्यालयीन कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे व उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांना केली. माजी मंत्री केदार आणि खासदार बर्वे यांनी उपोषण कर्त्यांना शब्द दिला की ह्या अशा असंवैदनशिल तहसीलदाराला आम्ही नक्कीच धडा शिकवू. जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना अशा प्रकारे त्रास होणार नाही. त्यानंतर माजी मंत्री केदार, खासदार बर्वे आणि उपविभागीय अधिकारी सचिन गोसावी यांनी उपोषण कर्त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली व उपोषण कर्त्यांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन निंबु शरबत पिवून आमरण उपोषण मागे घेतले. यावेळी उपोषण कर्त्यांसोबत सुरेश भोयर, प्रसन्ना तिडके,अवंतिका लेकुरवाळे, दिनेश ढोले, ज्ञानेश्वर वानखेडे, राजेश ठवकर, मंगला निंबोने, शेषराव देशमुख, विक्की साठवणे, शुभम तिघरे, राजेंद्र लांडे, ग्यानी रोहनकर, मनोहर भिवगडे, सहित शेकडो शेतकरी उपस्थीत होते.
प्रतिक्रिया
१) वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी साखळी उपोषणाची तयारी आम्ही करु. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही.
- योगेश देशमुख, सदस्य, जिल्हा परिषद नागपुर
२) १४ सप्टेंबरला बैठकीतही मी तहसीलदारांवर कारवाईचा मुद्दा रेटून धरणार आहे. उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
- रोशन मेश्राम, संचालक कृषि उत्पन्न बाजार समिती, मौदा