Saturday, December 21, 2024
Homeराज्यभाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश...

भाजपाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश…

शिशुपाल पटले यांच्या प्रवेशाने भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस पक्ष आणखी मजबूत होणार: नाना पटोले

भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पुर्व विदर्भात काँग्रेस पक्ष संघटना अधिक मजबूत होणार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज टिळक भवन येथे शिशुपाल पटले यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, तुमसरचे माजी आमदार अनिल बावनकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या गैरकाराविरोधात जनतेमध्ये प्रचंड संताप आहे. या सरकारच्या सत्ताकाळात शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, तरूण, व्यापारी, मध्यमवर्गीय असा एकही समाजघटक समाधानी नाही. महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्य दिवाळखोर केले आहे. प्रत्येक कामामध्ये ४०-५० टक्के कमिशन घेतले जात आहे. राज्यात “कमिशन द्या आणि टेंडर घ्या” हे एकच काम सुरु आहे. शेतकरी, बेरोजगारांसह सर्वसामान्य जनतेला या सरकारने वा-यावर सोडले आहे. त्यामुळे या सरकाविरोधात जनतेत प्रचंड संताप आहे. भाजप आणि महायुतीच्या घटक पक्षातील नेते ही या सरकारच्या कामावर खुश नाहीत, त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक जणांनी काँग्रेस पक्षात केला आणि आगामी काळातही अनेक बडे नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

यावेळी बोलताना शिशुपाल पटले म्हणाले की, आपण अनेक वर्ष भारतीय जनता पक्षात काम केले पण आता तो भाजपा राहिला नाही. तो आता व्यापारी आणि ठेकेदारांचा पक्ष झाला आहे. या पक्षाला शेतकरी सर्वसामान्य जनतेशी काही देणेघेणे राहिलेले नाही. ईडी सीबीआय यासारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्ष फोडण्याचे घृणास्पद प्रकार करून सत्ता मिळवण्याचा हव्यास आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आवडलेला नाही. या देशातील आणि राज्यातील जनतेला न्याय देण्याचे आणि राज्याला पुढे घेऊन जाण्याचे काम काँग्रेस पक्षच करू शकतो, त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे असे शिशुपाल पटले म्हणाले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: