Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीवनतस्करी, वन्यप्राणी हत्या थेट शासन दरबारी..! सिरोंचा वनविभागातील वनाधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार...

वनतस्करी, वन्यप्राणी हत्या थेट शासन दरबारी..! सिरोंचा वनविभागातील वनाधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार…

आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी वेधले शासनाचे लक्ष

गडचिरोली – सिरोंचा वनविभागात मौल्यवान हजारो सागवान वृक्षाची कत्तल, तस्करी तसेच वन्यप्राण्याची हत्या प्रकरण चांगलेच गाजले होते. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्यात आला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी सातत्याने वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वनमंत्र्यांकडे निवेदनातून ध्यानाकर्षण केले होते.

मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नाली. अशातच आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी नुकताच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात वनविभागातील या गंभीर प्रकरणावर तारांकित प्रश्न उपस्थित करीत वनमंत्र्यांचे पर्यायाने शासनाचे लक्ष वेधले. जिल्ह्याचा दक्षिण टोक असलेल्या सिरोंचा वनविभागातील आठ वनपरिक्षेत्रात मौल्यवान सागवान उपलब्ध आहे. परराज्यासह देशविदेशात सागवानाला मोठी मागणी असल्याने या वनविभागात तस्कर सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे.

सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या आठ वनपरिक्षेत्र कार्यालयात संबंधित वनाधिकारी व कर्मचारी मुख्यालय राहत नसल्याने जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत सिरोंचा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड, सागवन तस्करी तसेच वन्यप्राण्यांची हत्या झाल्याचे निदर्शनास आले. एकट्या कमलापूर परिक्षेत्रात 500 ते 600 सागवन वृक्षाची कत्तल झाल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

वनविभागाद्वारे तस्करीच्या कारवाया दाखविल्या जात असल्या तरी तस्करांच्या कायमस्वरुपी मुसक्या आवळण्यात वनविभागाला अपयश आल्याचे यावरुन स्पष्ट होते. परिणामी वृक्षांची कत्तल राजरोस सुरुच असल्याने तस्कर व वनविभागातील अधिकारी यांच्यात संगमनत असल्याच्या शंकेला पेव फुटले आहे. तस्करांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी वनविभागाद्वारे विशेष पथकाची नेमणूक करण्याची मागणी होत असतांना यावर कोणतीही न करता संबंधित बेजबबादार वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना अभय देण्यात आले.

सिरोंचा वनविभागातील ही गंभीर बाब आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी नुकताच नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रकर्षाने मांडली. याबाबत त्यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून तारांकित प्रश्न उपस्थित करीत शासनाद्वारे संबंधित दोषींवर कोणती कार्यवाही करण्यात आली वा करण्यात येणार आहे, नसल्यास विलंबाचे कारण काय? असे प्रश्न उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले. यावेळी वनमंत्री यांनी सखोल चौकशीअंती संबंधित दोषी वनाधिकारी व कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

ताटीकोंडावार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

सिरोंचा वनविभागांतर्गत अधिकारांच्या संगनमताने झालेली अवैध वृक्षतोड, मौल्यवान वनसंपदेची तस्करी तसेच वन्यजीव हत्या प्रकरणाबाबत जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारा समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार वेळोवेळी पाठपुरावा केला. सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन संबंधित दोषी वनाधिका-यांसह कर्मचाऱ्यांवर उचित कार्यवाही करण्यासंदर्भात गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक याचेंकडे निवेदन सादर केले होते.

मात्र वरिष्ठ स्तरावरुन कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी आ. धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदनातून प्रकरणाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. एवढेच नव्हे तर त्यांनी खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन उचित कारवाई सदंर्भात संबंधित वनाधिकाऱ्यांना निर्देश देण्याची विनंती केली होती. याअंतर्गत वनमंत्र्यांनी वन विभागाचे प्रधान सचिव यांना अहवाल सादर करण्याबाबत आदेश दिले होते.

मात्र शासन स्तरावरुन कोणतीही कार्यवाही न झाल्याने आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी हिवाळी अधिवेशनात ताटीकोंडावार यांच्या तक्रारीवर शासनाने संबंधित दोषींवर कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले. ताटीकोंडावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सिरोंचा वनविभागातील ढिसाळ कारभार शासन दरबारी पोहचल्याने या प्रकरणातील दोषींवर लवकरच कारवाई होण्याची चिन्हे बळावली आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: