रामटेक – राजू कापसे
प्रख्यात पेंच व्याघ्र प्रकल्पातील तोतलाडोह डॅम तलाव परिसरात काल दि. २३ डिसेंबर ला मासेमारी करण्यासाठी आलेल्या मासेमारांवर पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या विशेष संरक्षण दलाच्या चमुने जबरदस्त कारवाई करीत होणाऱ्या अवैध मासेमारीचा प्रयत्न हाणून पाडला.
या कारवाईत तब्बल १२० जाळे तथा काही मोठ्या बोटी जप्त करण्यात आल्या असल्या तरी मात्र मासेमार पळुन जाण्यात यशश्वी झाले. सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, काल दि. २३ डिसेंबर च्या सायंकाळी तोतलाडोह डॅम तलाव परिसरात मध्यप्रदेश व महाराष्ट्र सिमेवरील बेटावर काही मासेमार अवैध मासेमारीसाठी आले विशेष संरक्षण दलाची तुकडीने घटनास्थळावर जाऊन अवैध मासेमारी करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या मासेमारांवर कारवाई केली.
जवानांना पाहताच मासेमार जाळे व बोटी तेथेच सोडुन मध्यप्रदेशच्या दिशेने पसार झाले. विशेष संरक्षण दलाच्या जवानांनी त्यांच्यावर कारवाई करीत त्यांचेकडील तब्बल १२० जाळे व काही बोटी ताब्यात घेतल्या. सदरची कारवाई पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभुनाथ शुक्ला व सहाय्यक वनसंरक्षक महेश परब यांचे मार्गदर्शनात करण्यात आली असून पुढील तपास वनपरीक्षेत्र अधिकारी मंगेश ताटे हे करीत आहे.