रामटेक – राजु कापसे
गिधाड (जटायू) पक्ष्यांचे संवर्धन यशस्वी होण्यासाठी औषधी विक्रेत्यांना मार्गदर्शन करण्याचे दृष्टिकोनातून दिनांक २४/०१/२०२४ रोजी रामटेक येथे केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन रामटेक यांच्या मदतीने कार्यशाळा घेण्यात आली.
यामध्ये श्री अभिमन्यू काळे माननीय आयुक्त अन्न व औषधी प्रशासन महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली श्री विराज पौनिकर (नागपूर विभाग), श्री मनीष चौधरी औषधी निरीक्षक नागपूर तसेच एन डी सी डी ए सचिव श्री संजय खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच सदर कार्यशाळेत पेंच प्रकल्पाला लागून असलेली गावे प्रामुख्याने पारशिवनी, खापरखेडा ,सावनेर ,कामठी मौदा , कन्हान ,पवनी, देवलापार ,रामटेक ,भंडारबोडी,काचुरवाही, नगरधन या गावातील औषध विक्रेते हजर होते.
कार्यशाळेत उपस्थित असलेल्या सर्व औषधी विक्रेत्यांना सह आयुक्त नागपूर श्री विराज पवनीकर यांनी मार्गदर्शन केले की गिधाड (जटायू) या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास झाला तेव्हा असे निदर्शनास आले की गिधाड हे मुख्यत्वे मृत झालेल्या जनावरांचे मांस खाऊन जगत असते परंतु त्या मृत जनावरांची डायक्लोफिनॅक, aceclofenac, सारख्या औषधांचे सेवन केले असेल व त्या जनावरांचे मास पक्षांच्या खाण्यात आल्यास त्यात असलेल्या डायलॉफिनायक औषधांच्या अंशामुळे गिधाड पक्षांच्या किडनीवर विपरीत परिणाम होऊन त्यांचा मृत्यू होत असल्याचे संशोधनात निदर्शनास आले आहे.
त्यामुळे डायक्लोफिनॅक असे विनायक व की टू प्रोफेन या औषधांचा वापर जनावरांसाठी होणार नाही यासाठी दक्ष राहणे बाबत सूचना दिली. तसेच मानवी वापरात येणारी औषधे सुद्धा जनावरासाठी वापरली जाण्यात येऊ नये. यासाठी दक्षता घेण्याबाबत सांगितले जेणेकरून प्रकल्प हा यशस्वी होईल.
श्री मनीष चौधरी औषध निरीक्षक नागपूर यांनी सुद्धा सदर प्रकरण बाबत मार्गदर्शन केले व निसर्ग समतोल राखण्यासाठी काही गोष्टींचे पालन होणे आवश्यक आहे व त्यासाठी बंदी असलेली औषधे ही जनावरांसाठी वापरण्यात येऊ नये व कायद्याचे पालन करून एक चांगले सामाजिक कार्य करणे बाबत आव्हान केले व उपस्थितांनी विचारलेल्या शंकेचे निरसन केले.
उपस्थित असलेल्या औषधी विक्रेत्यांनी सांगितले की जी औषधे बंदी आहेत ती आम्ही ठेवत नाही परंतु मानवी वापरासाठी असलेली औषधे सुद्धा जनावरांच्या वापरासाठी विक्री होणार नाही याबाबत दक्षता घेऊ असं सांगितले तसेच हे संवर्धन प्रकल्प निश्चित यशस्वी करू असे आश्वासन दिले.
सदर चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यासाठी भूषण देशमुख,राजेश किंमतकर,राजेश मथुरे,मनोज दमाहे,पराग किंमतकर आदींनी परिश्रम घेतले संचलन ऋषिकेश किंमतकर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.